लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : चंद्रपूर - बल्लारपूर मार्गावर भिवकुंड नाला परिसरात दुचाकीस्वाराचा अपघात झाल्याचे दिसल्यानंतर चार युवकांनी त्याची लगेच मदत केली. यावेळी दुचाकीस्वाराजवळ असलेली एक लाख २९ हजार ९३० रुपये एवढी मोठी रक्कमही पोलिसांकडे सुपुर्द केली. ही स्तुत्य कामगिरी करणाऱ्या निषित कडूकर, धनपालसिंग वधावन, अक्षय आसटकर, राधे कविश्वर या युवकांचे कौतुक होत आहे. या अपघातात जखमी झालेल्याचे नाव अमोल यशवंत वट्टे (३८, रा. कन्नमवार वॉर्ड, बल्लारपूर) असे आहे.
अमोल वट्टे हे मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास चंद्रपूरहून बल्लारपूरकडे दुचाकीने येत असताना भिवकुंड नाल्याजवळील निर्मल धाब्यासमोर त्यांची दुचाकी घसरल्याने ते पडले. या अपघातात अमोल जखमी झाले. दुचाकीस्वार जखमी झाल्याचे बघून तेथे असलेले चारही युवक जखमीच्या मदतीला धावत आले व त्यांनी दुचाकीस्वाराला सावरले तसेच अपघाताची माहिती पोलिसांना कळवली. या दरम्यान जखमीजवळ असलेली बॅग रस्त्यावर पडली. त्यात एक लाख २९ हजार ९३० रुपये होते. पोलीस घटनास्थळी पोहोचताच पोलिसांसह या चौघाही युवकांनी अमोल यांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी पोलिसांना मदत केली. सोबतच त्यांच्याजवळील पूर्ण रक्कम पोलिसांकडे सुपुर्द केली. पोलीस निरीक्षक उमेश पाटील, उपनिरीक्षक अनिल चांदोरे, पोलीस शिपाई विलास खरात यांनी जखमीच्या नातेवाइकांना ही रक्कम परत केली.