जयंत जेनेकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील रणजित हरिचंद्र थिपे यांनी घवघवीत यश संपादन केले. त्यांच्या यशाची कथा प्रस्तुत प्रतिनिधीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना आजची तरुणाई व अभ्यासाचे महत्त्व यावर विविध प्रश्न विचारले. त्यातील काही निवडक प्रश्न व त्याची उत्तरे.
युपीएससी परीक्षेची तयारी करायची हे केव्हा ठरविले?- इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असताना ठरविले होते आणि तेव्हापासूनच त्यावर भर देत सुरुवात केली. त्यातून विविध स्पर्धा परीक्षा विषयक पुस्तके चाळण्यास प्रारंभ केला.
पूर्वतयारी कशी केली पाहिजे ?-यावर बोलताना मागील झालेल्या परीक्षांतील प्रश्नपत्रिका सोडून बघितल्या पाहिजे. तसेच यूपीएससी अभ्यासक्रमातील प्रत्येक बारकावे सखोल अभ्यासले गेले पाहिजे.
यूपीएससी साठी कुठल्या पद्धतीने अभ्यास करावा ?- कुठल्याही परीक्षेला सामोरे जाण्यासाठी एक शास्त्रीय पद्धत असते. ही पद्धत अवलंबली की त्यातील गोष्टी समजून घेण्यास मदत होते. आणि ते पद्धत सुरळीत होते. ती पद्धत आत्मसात करून अभ्यास केला पाहिजे. यातून आपल्याला त्या प्रश्नाशी संबंधित उत्तर कसे द्यायचे ते कळते. त्यासाठी त्याचा अभ्यासक्रमपण अभ्यासला गेला पाहिजे.
इंटरव्यूमधला कुठला प्रश्न अविस्मरणीय ठरला ?- इंटरव्यूमध्ये मला कृषी मंत्रालयात तुम्हाला सेक्रेटरी केलात तर तुम्ही कृषीमधील समस्या कशा सोडवणार, असे विचारण्यात आले. यावर मी मार्मिकपणे उत्तर दिले. ते असे, भारतातील संपूर्ण शेतीविषयक धोरण बदलणे गरजेचे आहे. आणि त्यातल्या संदर्भनिहाय बाबी सांगितल्या व शेतीविषयक धोरण कसे असायला पाहिजे, याबद्दल माहिती दिली.
यूपीएससीच का निवडले?- साधारणता चर्चेत आपण सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करतो. पण त्यावर काही उपाययोजना करू शकत नाही. युपीएससी सेवेच्या माध्यमातून जे पद मिळेल, तिथे आपण स्वकल्पनेतून सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. त्यामुळे युपीएससी सेवेला मी प्राधान्य दिले.
विदर्भात युपीएससीचा टक्का वाढवण्यासाठी काय केले पाहिजे ?- विदर्भात खासगी कोचींग बऱ्याच ठिकाणी आहे. मात्र येथील शुल्क गोरगरीब विद्यार्थ्यांना परवडण्याजोगे नाही. नागपूरवगळता कुठेही सरकारी कोचींग इन्स्टिट्यूट नाही. त्यामुळे प्रत्येक जिल्हास्तरावर हे शासकीय कोचींग इन्स्टिट्यूट उभारण्यात यावे. यातून येथील विद्यार्थ्यांना चालना मिळेल.
अभ्यासात कुठल्या गोष्टीवर जास्त भर द्यावा ?- आजकाल कोचींगचे मोठया प्रमाणात फॅड आले असले तरी विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडीवर भर दिल्यास या परीक्षा उत्तीर्ण करण्यास कुठलीही अडचण येणार नाही. शिवाय कोचींग व्यतिरिक्त या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घेतल्यास ते उपयुक्त ठरेल.
आपले पुढील उद्दिष्ट ?- लोकसेवा आयोगाची परीक्षा सध्या तर उत्तीर्ण झालो आहे. त्यानंतर जी जबाबदारी या आयोगामार्फत देण्यात येईल, ती समर्थपणे पेलण्याची काळजी घेईल.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया नवतरुणांना संदेश ?- तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करता ती अतिशय कसोशीने करा. स्वत:ला त्यात झोकून द्या. चालू घडामोडीवरही बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. असे केल्यास यश निश्चितच तुमच्या पदरात पडेल.