रत्नाकर चटप - नांदाफाटाकोरपना तालुक्यातून तीन राज्यमहामार्ग जातात. मात्र हे तीनही मार्ग दुर्लक्षित अवस्थेत असल्याने नागरिकांना या मार्गाचा प्रवास जिवघेणा ठरत आहे. यामध्ये राजुरा-कोरपना- आदिलाबाद, गडचांदूर-भोयगाव-महाकुर्ला, देवाडा-वनोजा-राळेगाव या तीन राज्यमहामार्गाचा समावेश आहे. १५ वर्षापूर्वी भोयगाव पुल बांधण्यात आल्याने पुढे यवतमाळ, नागपूर जिल्ह्याला जोडणारा राज्यमहामार्ग तयार झाला. त्यानंतर तालुक्यातील वनोजा पुलाच्या बांधकामामुळे राळेगाव-वर्धा-नागपूर असा मार्ग तयार झाला तर आंध्रप्रदेशात जाण्यासाठी चंद्रपूर - बल्लारपूरवरून पुढे राजुरा-गडचांदूर-कोरपना-आदिलाबाद (तेलंगाना) आणि पुढे मराठवाड्यात नांदेडकडे जाणारा मार्ग कोरपना तालुक्यातून जातो. सदर तालुका औद्योगिक तालुका असल्याने वाहनांची वर्दळ कायम असते. मात्र रस्त्याची अवस्था गंभीर आहे. यातील तिनही रस्ते कुठे अर्धवट बांधकाम तर डांबरीकरणाविनाच दिसत आहे. गडचांदूर-भोयगाव मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले असुन काही महिन्यांपूर्वी डांबरीकरणही करण्यात आले होते. मात्र पुरामुळे व वाहनांची प्रचंड वर्दळ असल्याने भोयगाव ते धानोरा या गावापर्यंत प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नांदाफाटा वनोजा फाट्यापर्यंत रस्त्याची अवस्था दयनिय आहे. राजुरा - आदिलाबाद मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असुन गडचांदूर ते धामणगाव फाटा, सोनुर्ली ते वनसडी पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. भोयगाव रस्त्याच्या मागणीसाठी अनेकदा निवेदने देण्यात आली. यापुर्वी आंदोलन करून गावकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर या मार्गाच्या कामासाठी मंजुरी मिळाली असल्याचे लोकप्रतिनिधींकडूनही सांगण्यात आले. मात्र अजूनही भोजगाव रस्त्याचा भोग कायम आहे. या रस्त्याच्या दैनावस्थेमुळे काही दिवस विद्यार्थ्यांची एस.टी. बस बंद होती तर भाजीपाला विकणारे, दुध विक्रेते, शेतकरी आणि कामगार कमालीचे हैराण आहे. कोरपना तालुक्यातील नागरिकांना चंद्रपूर - नागपूर प्रवास करायचा असल्यास बल्लारशहा मार्गापेक्षा भोयगाव मार्ग आर्थिकदृष्ट्या कमी अंतरामुळे अधिक सोयीस्कर आहे. त्यामुळे नरकयातना सहन करीत नाईलाजास्तव नागरिक प्रवास करीत आहे. यातच अनेक शासकिय कर्मचारी, अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी दुचाकी व सायकलने या मार्गावरून प्रवास करतात. सिमेंट कंपन्यांचे ओव्हरलोड जडवाहने सततचालुच असतात. जिवघेण्या खड्डयांमुळे आता रस्त्यावर धुळ उडताना दिसत असुन रस्ता दिवसेंदिवस उखडत चाललेला आहे. (अंतिम)
तालुक्यातील तीनही राज्यमहामार्गावर खड्डेच
By admin | Published: January 01, 2015 11:00 PM