कोरपना : शहरातील तलावापासून खैरगाव व शेतशिवाराकडे जाणाऱ्या पांदण रस्त्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून केली जात आहे. रस्ता झाल्यास नागरिकांसाठी सोईचे होणार आहे. त्यामुळे या बाबीकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे.
येलापूर-येन्सापूर रस्त्याची दुरुस्ती करा
कोरपना : तालुक्यातील येलापूर, येन्सापूर, कारगाव, पिपरी, बाखर्डी ते नांदा आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बांधकाम विभागाने दुरुस्तीची कामे सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वाहनावर मोबाइलचा वापर धोकादायक
सिंदेवाही : वाहन चालवताना मोबाइलवर संभाषण करणे कायद्याने गुन्हा आहे; परंतु आजही अनेक जण महामार्गावरील तसेच शहरातील रस्त्याने दुचाकी, चारचाकी वाहन चालवताना मोबाइलवर संभाषण करताना दिसून येत आहेत. हा प्रकार त्यांच्या व इतरांसाठीही धोकादायक आहे.
राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक नाही
कोरपना : राजुरा ते आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खिर्डी ते राज्य सीमादरम्यानच्या मार्गावर दिशादर्शक व अंतर फलक नसल्याने वाहतूकदारांची गैरसोय होत आहे. सदर महामार्ग जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीचा महामार्गांपैकी एक आहे.
आवळगाव ते कोसंबी रस्त्याची दुरवस्था
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव ते कोसंबी रस्त्याची अत्यंत दैन्यावस्था झाली आहे. हा रस्ता कित्येक वर्षांपासून कच्चा असून, या संपूर्ण रोडची गिट्टी उखडलेली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत.
पीक विम्यासाठी शेतकऱ्यांच्या चकरा
चिमूर : तालुक्यातील शेकडो कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला; पण विम्याचा लाभ मिळाला नाही. विमा रकमेसाठी शेतकरी कृषी कार्यालयात चकरा मारत आहेत.
घंटागाडीची दुरुस्ती करावी
चंद्रपूर : शहरात दररोज सकाळी घंटागाडीद्वारे कचरा संकलन केला जात आहे. मात्र, काही वाॅर्डांतील घंटागाडींची दुरवस्था झाली आहे. अनेक वेळा कचरा रस्त्यावर सांडत आहे.
दूरसंचार कार्यालयाची दुरुस्ती करावी
कोरपना : येथील बीएसएनएलच्या दूरभाष केंद्राची दुरवस्था झाली आहे. परिणामी, या भागात झुडपांचे साम्राज्य आहे. येथील कार्यालय नावापुरतेच असून, अधिकारी व कर्मचारीही नाही. त्यामुळे नागरिकांना राजुरा येथे जाऊन आपली कामे करावी लागते आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता
गडचांदूर : गडचांदूर रेल्वे क्राॅसिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र, गतिरोधक नसल्याने हा महामार्ग धोकादायक ठरत आहे. या महामार्गावर असलेल्या राजीव गांधी चौक (पेट्रोल पंप) संविधान चौक (बसस्थानक) व वीर बाबूराव शेडमाके चौक येथे गतिरोधक नाही.