गोवरी : राजुरा तालुक्यातील खामोना-पाचगाव-वरुर रोड हा १२ किलोमीटरचा रस्ता असून खूप अरूंद व लहान रस्ता आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असल्याने चांगल्या रस्त्यांचे अल्पावधीतच बारा वाजले आहे.
गडचांदूरकडून किंवा तेलंगणातून येणारे मालवाहक वाहन कमी कालावधीत व कमी अंतर लागेल या कारणासाठी खामोना-पाचगाव वरूररोड या मार्गाने जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मागील महिन्यात संध्याकाळी ८ वाजताच्या सुमारास अहेरी गावाजवळ मालवाहक ट्रकने पाचगाव येथील पोस्टमन संतोष बद्देलवार यांना खामोनावरून पाचगावला येताना धडक मारली. त्यामुळे त्यांचा पायाला मोठी दुखापत झाली होती. सुदैवाने ते त्या अपघातातून बचावले. खामोना-पाचगाव मार्गावर आता ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने मोठ्या प्रमाणात अपघातांच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन खामोना-पाचगाव-वरुर मार्गाने सुरू असलेली जडवाहतूक बंद करावी, अशी मागणी पाचगाव येथील माजी तंटामुक्त अध्यक्ष तिरूपती इन्दुरवार, माजी उपसरंच गोपाल जंबूलवार, रुपेश गेडेकर,सुरेष वडस्कर, मारोती चन्ने, विजय भोयर , सुनील गौरकर, महेश काकडे यांनी केली आहे.
060921\img_20210906_133830.jpg
खामोना -पाचगाव_वरुर रस्ता देतोय अपघाताला आमंत्रण