चंद्रपूर : विकासाच्या दृष्टीने सावली तालुक्यामध्ये आतापर्यंत शंभर कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासाला गती प्राप्त झाली असून विकासकामांची ही मालिका अशीच सुरू राहणार आहे, अशी ग्वाही राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. खेडी या गावांमध्ये विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, सरपंच सचिन काटपल्लीवार, उपसरपंच मुक्ता गडतुलवार, पंचायत समिती सदस्य ऊर्मिला तरारे, राकेश गड्डमवार, दिनेश पाटील चिटनुरवार, राजू सिद्दम, तहसीलदार परीक्षित पाटील, तलाठी जाधव, उपविभागीय अभियंता चंद्रशेखर कटरे, शाखा अभियंता सुधीर राऊत आदी उपस्थित होते. विविध विकासकामांमध्ये मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन, तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण इत्यादी कामांचा समावेश आहे. या वेळी खेडी गावातील सर्व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.