चंद्रपूर : कुलूपबंद घर हेरून घरफोडी करून सोने, चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने मुसक्या आवळल्या असून चंद्रपूर जिल्ह्यासह, भंडारा येथील घरफोडी उघड केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ६८ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अमोल आदेश इलमकर (२०), ज्ञानेश्वर गुलाब बोरकर (२३) दोघेही रा. दुर्गापूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
चंद्रपूर शहरातील जोडदेऊन पठाणपुरा रोड परिसरातील कुलूपबंद घर हेरुन सोन्याची गोप, झुमका पडविण्यात आल्याची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. त्यासोबतच शहर पोलीस स्टेशन हद्दीतील दिशा अपार्टमेंट, घुग्घुस पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शातकराम परिसर, रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चांदमारी परिसर येथील कुलूपबंद घरे हेरुन घरफोडी केल्याची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे येताच त्यांनी आपले सुत्रे गतीने फिरवून अमोल इलमकर, ज्ञानेश्वर बोरकर यांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी चंद्रपूरसह साकोली येथेही घरफोडी केल्याचे कबुली दिली. यावेळी चोरट्यांकडून सोन्याचा झुमका, गोप, चखदिवा ग्लास, चांदीची कटोरी, नंदादीप, सोन्याचे रिंग, कानातले, रोख सात हजार रुपये, चाळ, मंगळसूत्र, चांदीची मूर्ती असा एकूण ६८ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, संजय आतकुलवार, महेंद्र भुजाडे, अमजद खान, चंदु नागरे, अविनाश दाखमवार, कुदनसिंग बावरी, प्रशांत नागोसे, नितीन रायपुरे यांनी केली.