पेट्रोल-डिझेलची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अंवलबून असते. बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दरात वाढ झाल्याचे कारण पुढे करीत शासनाकडून पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये दररोज वाढ केली जात आहे. सद्य:स्थितीत पेट्रोल व डिझेल शंभरी पार झाली आहे. याच्या दरवाढीचा फटका सर्वच क्षेत्रावर बसला आहे. किराणा साहित्यासह भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनीही भाड्यांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे भाजीपाला, किराणा साहित्यात वाहनांची भाडेवाढ लावली जात असल्याने त्यांच्या दरात वाढ झाली आहे. शेतीचा कामे जोरात सुरू असल्याने शहरात भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यातही दोन दिवसांपूर्वी गॅस सिलिंडरच्या दरात २५ टक्क्याने वाढ करण्यात आली. त्यामुळे गृहिणीचे बजेट कोलमडले आहे.
बॉक्स
फुल कोबी ८० रुपये किलो
ग्रामीण भागात शेतीच्या कामाने जोर पकडल्याने शहरात भाजीपाला येणे बंद झाले आहे. केवळ बाहेरुन येणारा भाजीपाला बाजारपेठेत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने गाडीभाड्यात वाढ झाली असल्याने भाजीपाल्याच्या किमती वाढल्या आहेत. फुल कोबी ८० रुपये किलो, वालाच्या शेंगा ८० रुपये, हिरवी मिरची १०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.
बॉक्स
ट्रॅक्टरची शेतीही महागली
मजूर मिळत नसल्याने शेतीसाठी यंत्राचा वापर करण्यात येत आहे. नांगरणी, वखरणी करण्यासाठी बैलबंडीऐवजी ट्रॅक्टरचा वापर करण्यात येत आहे. मात्र डिझेलच्या दरात वाढ झाल्याने ट्रॅक्टर मालकांनी मशागत, नांगरणी, पेरणीचे दरही वाढवले आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरची शेतीही महागली आहे.
--------
बॉक्स
तेलामध्ये दहा ते २० रुपयांची घसरण
किराणा वस्तूमध्ये अनेक वस्तूचे दर अव्वाच्या सव्वा वाढले आहेत. काही महिन्यांपूर्वी तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. शंभर रुपये लिटर असणारे तेल १७० ते १८० रुपयांपर्यंत गेले होते. मात्र मागील महिन्यांपासून तेलाच्या दरांमध्ये दहा ते २० रुपयांनी घसरण झाली आहे. तरीसुद्धा प्रति लिटर १३५ रुपये दर असल्याने सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.
बॉक्स
घर चालविणे झाले कठिण
लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. याऊलट जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. सरकारने सर्वसामान्यांचा विचार करून वाढत्या महागाईवर अंकुश ठेवण्याची गरज आहे.
- प्रणिता गेडाम, गृहिणी
----
कोरोनाने सर्व अर्थचक्र बिघडवले आहे. अशा कालावधीत सरकारकडून दिलासा देणे गरजेचे आहे. मात्र सरकारकडून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.
-रंजना रायपुरे गृहिणी
-----
व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया
मागील काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे भाडेवाढ करण्यात आली आहे. किराणा दरात तशी वाढ झाली नाही. तेलाचे दर दहा ते रुपयांनी कमी झाले आहेत.
-प्रकाश रापेल्ली, व्यापारी
----
इंधन दरात झालेल्या भाववाढीचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसत आहे. त्यात अनेकांकडून माल पार्सल केल्यानंतर आगाऊ भाड्याचे बोलले जाते. त्यामुळे अधिकचे दर कसे लावणार असा प्रश्न पडतो. त्यामुळे वाहतूक भाडे अन् वाढीव किमतीचे गणित जुळवितांना कसरत करावी लागत आहे.
-प्रदीप गेडाम, व्यापारी