विसापुरातील घटना : रेल्वेच्या धडकेत बालकाचा मृत्यूबल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथील दोन भावंड कटलेल्या पतंगाला पकडण्यासाठी रेल्वे रुळावर धावत आले. त्याचवेळी बल्लारपूर-गोंदिया रेल्वे आली. या रेल्वेच्या धडकेत एका बालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा भाऊ थोडक्यात बचावला. ही घटना शनिवारी दुपारी २.४५ वाजता विसापूर रेल्वे स्थानकाजवळ घडली.क्रिष्णा मुकुंदा पाल (१०) रा. विसापूर असे मृत बालकाचे नाव आहे. तो जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चवथ्या वर्गात शिकत होता. मुकुंदा पाल यांनी रोहित व क्रिष्णा अशी दोन मुले आहेत. दोघेही शनिवारी सकाळी शाळा सुटल्यानंतर घरी आले. घरी असताना त्यांना कटलेली पंतग उडत येत असताना दिसली. दोघेही भाऊ पतंगांचा मागे धावत सुटले. घराजवळून जाणाऱ्या बल्लारपूर-गोंदिया रेल्वे मार्गावर धावत आले. याचदरम्यान बल्लारपूरकडून गोंदियाकडे जाणारी रेल्वे धडधडत आली.त्यात क्रिष्णा अडकला. त्याला सोडविण्यासाठी रोहितने प्रयत्न केले. मात्र यात रोहितला यश आले नाही. रेल्वे इंजिनने क्रिष्णाला फरफटत नेल्याने क्रिष्णाचा जागीच मृत्यू झाला. रेल्वेत अटकलेल्या भावाला सोडविण्यासाठी रोहितने जिवाच्या आकांताने प्रयत्न केला. यादरम्यान तो थोडक्यात बचावल्याचे रेल्वे स्थानकावरील प्रत्यक्षदर्शीने सांगितले.याप्रकरणी विसापूर पोलीस चौकीत मर्ग दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास मेजर नैताम व भगत करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)
पतंग पकडणे जिवावर बेतले
By admin | Published: November 29, 2015 1:54 AM