चिमूर : एकेकाळी जंगलांनी वेढलेल्या गावांना खेडे, आदिवासी गाव असे म्हणून टवाळी केली जात असे. मात्र ताडोबा जंगलातील वाघाने आज याच गावांना सातासमुद्रापार नेऊन पोहोचवले आहे. चिमूर तालुक्यातील कोलारा या हजार लोकवस्तीच्या गावात आजघडीला १५ रिसॉर्ट आहेत. त्यामुळे हेच आदिवासीबहुल गाव आता रिसॉर्टचे गाव म्हणून ओळखले जात आहे. याच -गावात बनवलेल्या रिसॉर्टमध्ये मोठमोठे सेलिब्रिटी येऊन दोन-तीन दिवस मुक्काम ठोकत आहेत.
जगात वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प हा चिमूर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. तालुक्यातील मासळ, कोलारा गाव हे जंगलव्याप्त गाव आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मितीअगोदर या गावात रोजगाराची वानवा होती. मात्र ताडोबात असलेल्या वाघांनी या गावातील नागरिकांचे पूर्ण जीवनमान बदलवून टाकले आहे.
हजार लोकवस्ती असलेल्या कोलारा येथे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे कोअर व बफरचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे या गावात देशविदेशातील पर्यटक हजेरी लावत आहे. त्याच्या वास्तव्यासाठी कोलारा गटग्रामपंचायत हद्दीत आजघडीला १५ चांगल्या दर्जाचे रिसॉर्ट आहेत. सोबतच गावात ५० जिप्सी, ४० गाईड, गेट व्यवस्थापक, रिसॉर्टमध्ये रोजगार असे अनेक रोजगाराची निर्मिती गावात झाली आहे. गाव सर्वसामान्य असून आजही जीवनमान ग्रामीणच आहे. मात्र गावात असलेल्या १५ रिसॉर्टमुळे गावाला एक वेगळी ओळख मिळाली आहे. याच परिसरात मासळ-४, मदनापूर-५, नंदारा (तुकुम)-७ व मानेमोहाडी २ असे एकूण ३३ रिसॉर्ट या परिसरात आहेत. काहींचे बांधकाम प्रगतीवर आहे. याच गावात भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यापासून अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटी मुक्कामी येऊन राहत आहेत.