राजेश भोजेकर
चंद्रपूर : जागतिक ख्यातीच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात होणारी सफारी कोविडच्या कारणावरून राज्य शासनाने डिसेंबर महिन्यापासून बंद केली आहे. दुसरीकडे शहरात दररोज अनियंत्रित गर्दी होत आहे. त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनही सुरू झाले. मग ताडोबाच्या पर्यटनासह यावर अवलंबून असणाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनाकडून हा दुजाभाव का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव देशभर आहे. महाराष्ट्रालगतच्या मध्य प्रदेशातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये सफारी सुरू आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने २४ जानेवारीपासून जिल्ह्यातील पर्यटन पर्यटकांसाठी कोरोनाचे नियम पाळत सुरू केले आहे. कोरोनाची जी स्थिती कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. जवळपास तीच स्थिती चंद्रपूर जिल्ह्याचीही आहे. काेल्हापूरसाठी एक निर्णय आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी दुसरा निर्णय का, असा सवालही व्यक्त होत आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सोमवारपासून ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ताडोबातील पर्यटन सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव त्यांनी राज्य शासनाला पाठविला आहे. या प्रस्तावावर मात्र सोमवारी दुपारपर्यंत कोणताही निर्णय झाला नव्हता.
त्यांचा वाली कोण?
चंद्रपूर जिल्ह्याच्या आर्थिक जडणघडणीत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची मोठी भूमिका आहे. या प्रकल्पावर त्या परिसरातील गावे आता निर्भर झालेली आहेत. शेकडो जिप्सीचालक, गाईड, रिसोर्ट संचालकांसह परिसरात असलेले दुकानधारक या सर्वांच्या कुंटुंबाचा उदरनिर्वाह ताडोबा पर्यटनावर अवलंबून आहे. शासनाने अचानक आदेश काढून ताडोबा सफारी बंद केल्याने त्याचा थेट परिणाम या मंडळींच्या पोटापाण्यावर झाला आहे.
शहरांमध्ये नियमांची ऐशीतैशी
राज्य शासनाने राज्यभरात कोविड नियमांचे पालन करावे, असे निर्बंध घातले आहे; मात्र हे नियम किती पाळले जातात, हा संशोधनाचा विषय आहे. चंद्रपुरातील संडे बाजार बंदचे आदेश असताना ३० जानेवारीचा हा बाजार दणक्यात भरला. लोकही खरेदीसाठी तुटून पडले होते. नियमांची जाणिव कुणाच्या चेहऱ्यावर नव्हती.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात होणारी सफारी बंद करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. त्यामुळे ते परत सुरू करण्याचा निर्णयही राज्य सरकारच घेऊ शकतात. ताडोबा व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन सकारात्मक आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाला प्रस्ताव पाठविला आहे. यावर आज वा उद्या सुरू करण्यासाठीचे निर्णय येऊ शकतात.
- अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर.
व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करावा
कोरोना संसर्गामुळे बंद करण्यात आलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या संदर्भात आ. मुनगंटीवार यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता आणि जिल्हाधिकारी श्री. अजय गुल्हाने यांच्याशी चर्चा केली.