लघु सिंचाई विभाग : संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीबी.यू. बोर्डेवार राजुरातालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर सहा महिन्यापूर्वी विदर्भ राज्य सिंचन योजनेतून १८ लाख रूपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. मात्र हा बंधारा पहिल्या पावसातच वाहून गेला. बंधाऱ्याचा एक पिल्लर वाहुन गेला असून बंधारा आता कुचकामी ठरला आहे. यात शासनाच्या निधीचा दुरूपयोग झाला असून बंधारा बांधकामाची चौकशी करून संबधीत उपविभागीय अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.पाण्याचा साठा राहावा, शेतीला मुबलक पाणी मिळावे, या हेतुने बंधारा बांधण्यात आला. मात्र जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लघुसिंचाई विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे १८ लाख रुपयांचा खर्च वाया गेला आहे. बंधाऱ्याच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, बंधाऱ्याच्या दोन्ही बाजुला पिचिंग केलेली नाही. त्यामुळे दोन्ही भागातून पाणी वाहत असते. बंधारा बांधताना अत्यंत निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरण्यात आले. त्यामुळे पहिल्याच पावसात बंधारा वाहुन गेला आहे. अकरा पिल्लरचा हा कोल्हापुरी बंधारा पाहता पाहता अत्यंत दयनिय अवस्थेत असून पिल्लर सुद्धा एका लाईनमध्ये उभे नाही. या बंधाऱ्याचे बिल काढताना लघु सिंचाई विभागाचे अधिकारी डोळेझाक करून बिल काढल्यामुळे शासनाच्या शेतकऱ्यासाठी असलेल्या कल्याणकारी योजनेचा बट्याबोळ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यात लघु सिंचाई विभागाने बांधलेल्या बंधाऱ्यांची चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे. निकृष्ठ बांधकामास प्रोत्साहन देणाऱ्या लघु सिंचाई विभागाच्या अभियंत्यावर आणि ज्यांनी निकृष्ठ काम केले त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.याबाबत प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी लघु सिंचाई विभागाचे उपविभागीय अभियंता यांना दुपारी १२.२० वाजताच्या सुमारास भ्रमणध्वनीवरू संपर्क साधला असता, ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने संपर्क होवू शकला नाही. निकृष्ठ व बोगस बंधारा बांधकामाची चौकशी केली जाईल. यात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार. - अॅड. संजय धोटे, आमदार राजुरा.
१८ लाखांचा कोल्हापुरी बंधारा सहा महिन्यांत वाहून गेला
By admin | Published: January 19, 2017 12:48 AM