देवाडा: आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत आदिवासी कोलाम व अनुसूचित जमाती बांधवाकरिता घरकूल योजना राबविण्यात येते. मात्र देवाडा परिसरातील अनेक कोलाम बांधव या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे झोपडीवजा घरांमध्ये वास्तव्य करूनच जीवन जगावे लागत आहे. सन २०१३ पासून घरकुल योजनेसाठी या परिसरताील कोलाम बांधवानी अर्ज केले. मजुरांचे पत्र किंवा ग्रामपंचायतीला या संदर्भात आदेश येतील, याची प्रतीक्षा करीत दोन वर्षे उलटली, मात्र अद्यापही यासंदर्भात कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत. शासनाने आदिवासींच्या सर्वांगिन विकासासाठी विविध योजना कार्यान्वित केल्यात. कोलाम बांधवासाठीही विविध योजना आहेत. मात्र त्या योजनांचा त्यांना कोणताही लाभ होताना दिसत नाही. त्यामुळे कोलाम बांधवांमध्ये रोष व्यक्त होत आहे. सहा महिन्यापूर्वी राज्यपाल सी. विद्यासागरराव चंद्रपूर दौऱ्यावर आले होते. राजुरा तालुक्यातील लक्कडकोट या गावात त्यांचा कार्यक्रम झाला. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर लक्कडकोट येथे मार्गदर्शन केले. पेसा कायद्याची अंमलबजावणी करुन कोलाम बांधवाना दिलासाही त्यांनी दिला. कायद्यात तरतूद करुन घरकुल असो किंवा अन्य कोणत्याही योजना असो त्याचा कोलाम बांधवांना प्राधान्याने लाभ देण्याची घोषणा त्यांनी त्यावेळी केली होती. मात्र ते आश्वासन गेले कुठे, असा प्रश्न कोलाम बांधवांना पडला आहे. आदिवासी विकास राज्यमंत्री विष्णू सावरा व आदिवासी विकास आदिवासी विभाग नागपूर यांनी याकडे लक्ष देऊन या भागातील आदिवासी बांधवांना दिलासा देण्याची मागणी आहे. (वार्ताहर) आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी शासनाकडून विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. या योजना तयार करण्यामागच्या उद्देश जरी प्रामाणिक असला तरी जेव्हा या योजना जिल्हास्तरापर्यंत पोहोचतात, तेव्हा पासूनच चांगल्या योजनांना प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांकडून उधळी लावण्याचे काम सुरू होते. देवाडा परिसरातही नेमका हाच प्रकार घडला आहे. रितसर केलेले अर्जही प्रलंबीत ठेवण्यात आले आहे.
कोलाम बांधव घरकूल योजनापासून वंचित
By admin | Published: September 23, 2015 4:55 AM