बि. यू. बोर्डेवार
राजुरा : तालुक्यातील स्मार्ट ग्राम मंगी (बु) हे एक विकासाचे प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे. नालीमुक्त पण शोषखड्डेयुक्त गाव. गावकऱ्यांची नियमित पहाटे ४.३० वाजता श्रमदानातून स्वच्छता, सौंदर्यांने व फुलांनी नटलेला बगिचाअसे या गावाचे वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे गावाच्या मध्यभागी असलेल्या कोंडवाड्याचे रुपांतर अतिशय कल्पकतेने सार्वजनिक वाचनालयात करण्यात आले आहे.
गावातील शालेय परिसर सुंदर ठेवण्यात आला आहे. शालेय परिसरातील आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली व्यायामशाळा आहे. गावाचे १०० टक्के कोरोना लसीकरण झाले आहे. स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथील सातत्याने चालणाऱ्या श्रमदानाची व विकासकामांची पाहणी करण्यासाठी भंडारा येथील अशोक ले लॅन्ड कंपनीचे युनिट हेड जोशी व त्यांचे असलेले मित्र मेंढे आणि पुरंदरे तसेच या चमूसोबत अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे तथा जितेंद्र बैस, संतोष विश्रोजवार तथा ज्योती खंडाळे यांनी गावाला भेट दिली. माजी उपसरपंच वासुदेव चापले यांनी स्मार्ट ग्राम तयार होण्याचा प्रवास कसा झाला, हे सांगताना सन २०१२ पासून ग्रामस्थ व युवकांनी सातत्याने दररोज पहाटे दोन तास ग्राम स्वच्छतेसाठी श्रमदान करीत आहेत. ही बाब अभ्यास दौऱ्यातून पाहणी करताना स्वच्छता पाहून पाहुणे मंडळी भारावली.
बॉक्स
गावात २२५० वृक्षांचे रोपण व संवर्धन
नालीमुक्त पण शोषखड्डेयुक्त गाव, सुंदर व मनमोहक बगीचा, सुंदर प्रवेशव्दार ही गावाची वैशिष्ट्ये तर आहेतच, सोबतच गावाच्या परिसरात २२५० वृक्षांचे वृक्षारोपण व संवर्धन करण्यात आले आहे. स्वच्छ शालेय परिसर, शाळा बंद पण शिक्षण सुरू उपक्रमाची अंमलबजावणी, १०० टक्के करवसुली, युवक - युवतींसाठी विविध स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने प्रशिक्षण वर्ग, शाळा व अंगणवाडी आयएसओ होण्यासाठीचे नियोजन इत्यादी नावीन्यपूर्ण उपक्रमही राबविण्यात आले आहेत.