जलस्रोत आटल्याने पाण्याची तीव्र टंचाई : वैद्यकीय अधीक्षकांची धुरा प्रभारीवर
कोरपना : तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय असलेल्या कोरपना येथील ग्रामीण रुग्णालय विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्यामुळे रुग्णाची हेळसांड होत आहे.
या ठिकाणी पाण्याची मुख्य समस्या आहे. येथील विहीर व कूपनलिका आटल्याने रुग्णालय व सदनिकेतील कर्मचाऱ्यांना एका खासगी बोअरवेलद्वारे अपुऱ्या पाण्यात पिण्याच्या पाण्याची व अन्य कामासाठी गरज भागवावी लागते आहे. त्यामुळे येथे नवीन कूपनलिका खोदण्याची गरज व्यक्त होत आहे. रुग्णालय परिसरात नव्याने विस्तारित ऑपरेशन थिएटर बांधण्यात येत असले तरी,
सद्यस्थितीतील रुग्णालयाची इमारत अपुरी पडत असून त्याचे विस्तारीकरण होणे आवश्यक आहे. प्रयोगशाळा, औषधी विभाग, वैद्यकीय अधिकारी कक्ष व अन्य विभागाला अपुऱ्या जागेत आपले कामकाज करावे लागत आहे. येथील वैद्यकीय अधीक्षकाचे पद मागील अनेक वर्षापासून तर एक कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई, एक्स रे टेक्निशियन आदी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहे. तसेच एक औषध निर्माता सिंदेवाही तर दंत रोग तज्ज्ञ वरोरा येथे प्रतिनियुक्तीवर आहे. नेत्र , स्त्री रोग तज्ज्ञ यांची पद निर्मितीच या स्थानी नसल्याने या संबंधित उपचारासाठी अन्यत्र जावे लागत आहे. क्ष किरण तंत्रज्ञाअभावी एक्स रे मशीनही धूळखात पडली आहे. सोनोग्राफीचीही सुविधा येथे अद्याप कार्यान्वित करण्यात आली नाही. रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली असल्याने सर्वत्र अस्वच्छता दिसून येत आहे. त्यामुळे हिंस्र प्राण्यांचा वावर येथे वाढला आहे. तसेच परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळेस सर्वत्र काळोख या भागात पसरलेला दिसतो. त्यामुळे प्रकाश व्यवस्था वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. कोरपना येथील रुग्णालयात तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्ह्यातून मोठ्या संख्येने रुग्ण येत असल्याने येथील सोयी सुविधा वाढण्याच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालयात रूपांतरण होणे आवश्यक आहे.
बॉक्स
तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाचे स्थलांतर करा
कोरपना येथील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय तालुका मुख्यालयी असण्याऐवजी गडचांदूर येथे आहे. याबाबत पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव घेऊन सदर कार्यालय कोरपना येथे हलविण्यात यावे, असे सुचविण्यात आले. त्या अनुषंगाने पंचायत समिती परिसरात इमारतही उपलब्ध करून देण्यात आली. मात्र कार्यालय स्थलांतराला अद्यापही केराची टोपली दाखवण्यात येत आहे.
बॉक्स
१८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण केंद्रही नाही.
जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालय स्थानी असलेल्या ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र कोरपना याला आजही अपवाद आहे. त्यामुळे येथील नागरिकांना इतर ठिकाणी जाऊन लस घ्यावी लागत आहे. तसेच ४४ वरील वयोगटातील नागरिकांसाठी असलेला लसीचा साठा अत्यल्प प्रमाणात आहे. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.