कोरपना : कोरोना लसीकरणात कोरपना तालुक्याने पन्नास हजारांचा आकडा पार केला आहे. या लसीकरण मोहिमेला गावा-गावात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
तालुक्याची अठरा वर्षांवरील वयोगटाची ९० हजार ५३३ लोकसंख्या आहे. त्यांना प्रत्येकी दोन डोस दिले जाणार आहेत. यापैकी चाळीस हजार नागरिकांनी प्रथम डोस, तर १० हजार ४५८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण ५० हजार ४५८ डोस आजपर्यंत देण्यात आले आहेत. तालुक्यात ११३ गावांपैकी २५ गावांत कोरोनाबधितांची संख्या शून्य आहे. या गावांतही शासन निर्देशानुसार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
लसीकरण अभियान नियोजनबद्ध व्हावे, यासाठी आरोग्य, महसूलसह सर्व प्रशासकीय यंत्रणा अथक् परिश्रम घेत आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत सकारात्मकता नागरिकांत दिसून येत आहे. तालुक्यात २७ ही लसीकरण केंद्रांत नागरिक स्वतःहून लस घेण्यास येत आहेत. यामध्ये सर्वाधिक लसीकरण गडचांदूरला, त्यापाठोपाठ कोरपना, नारडा या केंद्रांवरून झाले आहे. शहरी, ग्रामीण भागासह अल्ट्राटेक, अंबुजा, मानिकगड औद्योगिक वसाहतीत लसीकरणाला चांगला प्रतिसाद लाभत आहे.
कोट
कोरपना तालुक्यातील गावांत लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभतो आहे. प्रत्येक नागरिकाच्या लसीकरणासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा व्यापकदृष्ट्या जनजागृती करत आहे. अजूनही लस न घेतलेल्या नागरिकांनी कुठलीही शंका न बाळगता लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. स्वप्नील टेंभे
तालुका वैद्यकीय अधिकारी, कोरपना.