चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्व नागरिकांकरिता कोविड लसीकरणाबाबत काही शंका तथा माहिती व मार्गदर्शनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे कोविड लसीकरण हेल्पडेस्क सेंटर सुरू करण्यात आले आहे.
बुधवारी जिल्हा शल्य चिकित्सक तथा कोविड-१९ इन्सिडंट कमांडर डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशिक्षण केंद्र रूम क्र. ८, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे कोविड लसीकरण हेल्पडेस्क सेंटरचे उद्घाटन जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यात कोविड-१९ आजारावर नियंत्रण व उपाययोजना म्हणून वयोगट ४५ व त्यावरील सर्व वयोगटातील व्यक्तींना कोविड लसीकरण करण्यात येत असून १ मे २०२१ पासून वयोगट १८ व त्यावरील सर्व वयोगटातील व्यक्तींना कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. सर्व जनतेकरिता कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन असे दोन्ही लसीचे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना भारत सरकारची मान्यता असून दोन्ही लस पूर्णपणे सुरक्षित व प्रभावी आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व कोणत्याही प्रकारची शंका किंवा भीती न बाळगता लस घ्यावी.