विरुर (स्टे.) : उन्हाळ्यात जीवाची लाहालाही होत असताना माठातील शीतल जल अमृताप्रमाणे गोड वाटते. गरीबाचा फ्रिज म्हणून पहिली पसंती माठाला असते. उन्हाच्या चटक्यामुळे जीव पाणी पाणी करतो. तेव्हा गार पाणी मिळून तहान दूर होईल काय, असे प्रत्येकालाच वाटत असे. यांत्रिक युगात फ्रिज असतानासुद्धा गोरगरीबांचा फ्रिज म्हणून ओळखल्या जाणार्या माठातील पाण्याची चव काही वेगळीच असते. या पाण्याचा गोडवा सर्वांचीच तृष्णा दूर करते. परंतु माठ घडविणारा समाज आजही उपेक्षित आहे. कुंभारांनी आपल्या कला कौशल्याची वेगवेगळ्या आकारात व काळानुसार परिवर्तन घडवून आणले. रांजन, नांद, सुरई, मडके, माठ, गाडगे आदी छोटी मोठी आकाराचे मातीचे भांडे बाजारात आणतात. उन्हाळा सुरू झाला की, कुंभारांना सुगीचे दिवस येतात. असे असले तरी मडकी बनविण्याचा व्यवसाय करणार्या कुंभार समाजातील नवीन पिढी मात्र या व्यवसायाप्रती उदासीन दिसते. माठ बनवितांना माती आणणे, त्यामधील खडे वेगळे करणे, माती गाळणे, गाळा करणे, माती कमविणे, चाकावर लावून पगई तयार करणे त्यानंतर पगईला थोपटून माठ तयार केला जातो. गरम भट्टीमध्ये तयार झालेल्या माठाला रंग देणे व नंतर विक्रीसाठी पाठविणे असा हा प्रवास असतो. माठ घडविण्यासाठी कुंभाराला गरम भट्टीचे व शासन तथा समाज व्यवस्थेचे चटके सहन करावे लागत आहेत. कुंभार उदरनिर्वाहासाठी पारंपरिक व्यवसाय करीत आहे. कुंभार समाजात शिक्षणाचा प्रसार अत्यल्प असल्याने संपूर्ण कुटुंब याच व्यवसायावर अवलंबून असते. दिवसभर कामामुळे आई-वडिलांना मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देता येत नाही. आजच्या यांत्रिक युगात माती आणण्याकरीता बैलबंडी उपलब्ध होत नाही. वाहनाचे भाडे देणे परवडण्याजोगे नाही. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना माती आणण्यापासून सर्व कामे करावी लागतात. त्यातच नवीन पिढीचा या कामाकडे कानाडोळा असतो. त्यांना या व्यवसायात मुळीच रस नाही. शासनाने या समाजाकरिता माठ तयार करण्याचे नवीन तंत्रज्ञान वापरुन तरुणांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. या समाजातील युवकांना आर्थिक मदत देणार्या योजना तयार करुन वन विभागाकडून लाकडे मिळण्याकरिता परवाना देवून माती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी समाजाकडून होत आहे. (वार्ताहर)
लाखोंना गारवा देणारा कुंभार समाज आजही उपेक्षित
By admin | Published: May 11, 2014 11:29 PM