मूल : आई कोरोना पॉझिटिव्ह. तिची विलगीकरण कक्षात व्यवस्था करून दिली. दुसऱ्या दिवशी स्वतःही कोरोना पाॅझिटिव्ह निघाली. अशा परिस्थितीतही ती सामाजिक दायित्व जोपासत स्वत:सह इतर उपचार घेणाऱ्या रुग्णांना मदत करीत आहे.
कुमुद भोयर हे या तरुणीचे नाव आहे.
मूल तालुक्यातील पहिली महिला पत्रकार म्हणून कुमुदची ओळख आहे. गायन, पत्रकारिता यासह सामाजिक क्षेत्रातही कुमुदने भरीव सहभाग घेतला आहे.
चार दिवसांपूर्वी कुमुदची आई कोरोना पॉझिटिव्ह निघाली. मूल नगर परिषदेच्या मॉडेल स्कूलमध्ये तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये तिने आपल्या आईची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी कुमुदही पॉझिटिव्ह निघाल्याने तीही या केंद्रात भरती झाली. या केंद्रात मूल तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गरीब रुग्ण आहे. यातील अनेक रुग्णांजवळ मास्क, बाम, विक्स, यासारखी आवश्यक औषधी नसल्याचे तिच्या लक्षात आले. या वस्तू आणून देणारे जवळचे कोणी नातेवाईकही या रुग्णांकडे नव्हते. स्वतः उपचार घेत असतानाच सोबत असलेल्या रुग्णांची अडचण कुमुदच्या लक्षात आली. तिने सोशल मीडियावर या रुग्णांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला मूल नगरपालिकेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, सभापती प्रशांत समर्थ, प्रतिष्ठित नागरिक जीवन कोंतमवार, तालुका शिवसेनेचे अध्यक्ष नितीन येरोजवार, प्रवीण मोहुर्ले, किशोर कापगते यांनी प्रतिसाद देत भरपूर प्रमाणात मास्क, प्रत्येक रुग्णांना बाम, विक्स, बिस्कीट देत तातडीने मदत केली. हे साहित्य कुमुदने उपचार घेत असलेल्या रुग्णांना वाटप करून सामाजिक दायित्वाचा परिचय दिला.