मूल : एमआयडीसी परिसरातील पृथ्वी फेरो अलाय अॅण्ड पॉवर या कंपनीतील कामगारांच्या मागण्यासाठी अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या मार्गदर्शनात श्रमिक एल्गारने सोमवारी कामबंद आंदोलन केले.पृथ्वी फेरो अलाय अॅण्ड पॉवर लिमि. या कंपनीत परिसरातील शेकडो कामगार काम करतात. मात्र, कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिले जात नाही. भविष्यात निर्वाह निधीचा लाभ देण्यात येत नाही. कंपनीकडून मागील महिन्याचा पगार चालू महिन्याच्या चौथ्या आठवड्यात दिला गेला. साप्ताहिक रजा दिली जात नाही. कामगारांच्या या समस्यांना घेऊन श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात कंपनीसमोर कामगारांनी कामबंद आंदोलन केले. कंपनी व्यवस्थापक गुप्ता यांनी आंदोलनाची दखल घेत आंदोलकांसोबत चर्चा केली. व्यवस्थापकाने याच महिन्यापासून किमान वेतनानुसार वेतन देण्याचे मान्य केले असून साप्ताहिक रजाही देण्याचे कबूल केले आहे. भविष्य निर्वाह निधी व इतर प्रश्नांवर १६ जुलै रोजी संचालकांसोबत बैठक घेऊन कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कामगारांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात विजय सिद्धावार, डॉ. कल्याणकुमार, विजय कोरेवार, घनश्याम मेश्राम, प्रेमदास उईके, राजू कंचावार, दिनेश घाटे, सुनील झरकर, बाळू मडावी आदींचा सहभाग होता. (तालुका प्रतिनिधी)
कामगारांच्या प्रश्नांवर श्रमिक एल्गारचे आंदोलन
By admin | Published: July 16, 2015 1:26 AM