नागरिकांना माराव्या लागतात दवाखान्यात चकरा
तळोधी बा. - येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू झाले. मात्र येथे लसीचा तुटवडा असल्याने रिकाम्या हाताने नागरिकांना परत जावे लागते.
कोरोना रुग्णाचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ग्राफ वाढला आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी आवाहन केले जात असताना मात्र तळोधी बा. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारला लसीच्या तुटवड्यामुळे केवळ ११ लोकांना लसीकरण करण्यात आले. यात काही लोकांना प्रथम डोस तर काही लोक दुसरा डोस घेण्यासाठी येतात. मात्र नागरिकांना लस तुटवड्याची कल्पना नसल्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना दवाखान्यात येऊन रिकाम्या हाताने परत जावे लागते. हा प्रकार नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. आरोग्य विभागाने लक्ष देऊन तळोधी बा. येथील केंद्रात लसी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.