मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण
चंद्रपूर : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रात्री घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. शहरातील विविध वॉर्ड व मुख्य चौकात मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला आहे.
वीजबिलाची दुरूस्ती करावी
चंद्रपूर : शहरातील काही भागातील नागरिकांना महावितरण कंपनीकडून येणाऱ्या बिलांमध्ये अनेक त्रुटी असल्याने ग्राहक वैतागले आहेत. विजेचे जादा बिल तर, त्याच परिसरातील काही ग्राहकांना चुकीच्या नावाने बिल देण्यात येत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
बाबूपेठ परिसरात स्वच्छता करावी
चंद्रपूर : स्थानिक बाबूपेठ व नगिनाबाग परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत. कोरोनामुळे प्रत्येक घरात स्वच्छता केली जात आहे. काही ठिकाणी कचराकुंड्या नसल्याने बरेच जण मोकळ्या जागेत कचरा टाकतात. हा कचरा अनेक दिवसांपासून उचलण्यात आला नाही. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करा
चंद्रपूर : पादचाऱ्यांना सुरक्षितरित्या चालण्यासाठी रस्त्याच्या बाजुला फुटपाथची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, शहरातील विविध मार्गावर असलेल्या फुटपाथवर काही व्यावसायिक आपले वाहने पार्क करतात. एवढेच नाही तर साहित्यही ठेवतात. त्यामुळे फुटपाथवरून चालणे अवघड झाले आहे.