जिवती : यंदाचे शैक्षणिक वर्ष २८ जूनपासून सुरू झाले आहे. राज्य सरकार आणि शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मागील वर्षाप्रमाणेच ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शालेय जगातील नव्या तंत्रस्नेही युगामध्ये मुला-मुलींची एन्ट्री झाली आहे. मात्र जीवतीसारख्या आदिवासी आणि दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क नसल्याने ऑनलाईन शिक्षणाच्या सोयी- सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचे काय होणार? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाला गेल्या वर्षभरात सुटी मिळाली होती. मागील संपूर्ण वर्ष ऑनलाईन माध्यमातूनच विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले. प्राथमिक शाळा प्रत्यक्ष भरल्याच नाहीत, तर माध्यमिक शाळा अवघ्या एक ते दोन महिन्यांसाठी सुरू करण्यात आल्या. पुन्हा कोरोनाचा प्रकोप वाढल्याने शाळा बंद करण्यात आल्या होत्या. परिणामी परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना पास करण्यात आले. आता या विद्यार्थ्यांच्या पुढच्या वर्गाचे शिक्षणही ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले आहे. परंतु, जीवती तालुक्यासारख्या ग्रामीण भागात अनेकांकडे ऑनलाईन शिक्षणाची सोय नाही. तसेच मोबाईलला नेटवर्कमिळत नाही. त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बॉक्स
पीडीएफ स्वरूपात मिळणार पुस्तके
बालभारतीने इयत्ता पहिली ते बारावीच्या पाठ्यपुस्तकांच्या पीडीएफ विनामूल्य डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तकांमधील ''क्यूआर कोडच्या'' माध्यमातून शिक्षण सोपे करण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच सोमवारपासून शाळेला सुरुवात झाली. परंतु, ती ऑनलाईन स्वरुपात झाली आहे.
कोट
- सरकारच्या धोरणानुसार शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले असले, तरी शिक्षण विभाग चंद्रपूर यांच्या सूचनेनुसार शिक्षकांनी प्रत्यक्ष गृहभेटी देऊन विद्यार्थ्यापर्यंत पोहोचून अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यायचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
- सचिनकुमार मालवी,
शिक्षण विस्तार अधिकारी,
पंचायत समिती, जिवती