चंद्रपूर जिल्ह्यात फॅब्रिकेशन इंडस्ट्रीची व्याप्ती मोठी आहे. स्टील रेलिंगशी संंबंधित काही युनिट शहरात आहेत. लहान आकाराचे फॅब्रिकेशन युनिटही दीडशेच्या आसपास आहेत. त्याशिवाय कुलर व आलमारी आदी बनविणाऱ्या फॅब्रिकेशनची युनिटची संख्याही बरीच आहे. या प्रकारच्या दुकानांची अधिक संख्या दिसून येते आहे. लहान मोठ्या आकारातील सर्व युनिटची कमी - अधिक प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता असते. सद्यस्थितीत या प्रकल्पांना ऑक्सिजनचा शून्य पुरवठा आहे. त्यामुळे ऑक्सिजनशी संबंधित कामे बंद आहेत. फॅब्रिकेशन युनिट बंद पडले आहेत. ऑक्सिजन नसल्याने मूळ कामे सोडून इतर किरकोळ कामे सुरू आहेत. कटिंगसाठी प्रामुख्याने ऑक्सिजनचा वापर केला जातो. सध्या पुरवठा होत नसल्याने कामगारांवरही बेरोजगारीची वेळ आली. उत्पादन बंद असल्याने सुमारे दोन हजार कामगार बेरोजगार झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून उद्योगांना लागणाऱ्या कच्चा मालाचे दर वाढले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक वाढ स्टीलच्या दरांत झाली आहे. १५ ते ३० टक्के दरवाढ झाल्याने याचा वाईट परिणाम उद्योगांवर झाला. ही दरवाढ सुरू राहिल्यास उद्योगांना काही काळासाठी युनिट बंद करावे लागतील. स्टील शिवाय रसायने, प्लास्टिक, ॲल्युमिनियमचे दरदेखील वाढत आहेत. मागील दोन महिन्यांत झालेली दरवाढ जीवघेणी ठरण्याची शक्यता उद्योग वर्तुळात व्यक्त केली जात आहे. कोरोना संसर्ग आता कमी होत आहे. अशावेळी सरप्लस ऑक्सिजन उद्योगांना पुरविण्याची तयार प्रशासनाने करावी, अशी मागणी चंद्रपूर एमआयडीसीचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा यांनी केली.
ऑक्सिजनचा पुरवठ्याअभावी फॅब्रिकेशन इंडस्ट्रीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:29 AM