सावलीनगरासाठी २० कोटी रुपयांची विकासकामे प्रस्तावित आहेत. अनेक कामांना निधीसुद्धा उपलब्ध झाला आहे. त्यापैकी जागेच्या उपलब्धतेनुसार कामांना सुरुवात होणार आहे. मात्र अनेक कामे महसूल विभागाच्या जागेअभावी अडण्याची शक्यता आहे. ज्या जागा या शहर परिसरात उपलब्ध आहेत, त्यापैकी बहुतांश जागा वनविभागाच्या झुडपी जंगलात मोडत असल्याने विकासात्मक कामे करताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होणार आहेत, असेही ना. वडेट्टीवार म्हणाले.
सावली शहराला २४ तास पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने १ कोटी ९८ लाख रूपयांचे एक्स्प्रेस फीडर मंजूर करण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबाला नळजोडणी व मीटर लावण्यात येणार असून, त्याकरिता ३ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. महामार्गाच्या रस्ता दुभाजकाचे सौंदर्यीकरणासाठी लवकरच निधी उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचे बांधकाम, पोलीस प्रशासन व तर अनेक विभागांच्या सदनिकांकरिता निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय इतर अनेक कामांना गती द्यायची असल्याचेही यावेळी ना. वडेट्टीवार यांनी सांगितले. याप्रसंगी सावली पं.स.चे सभापती विजय कोरेवार, जि.प.चे माजी बांधकाम सभापती दिनेश चिटनुरवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विजय मुत्यालवार उपस्थित होते.