पदावर गंडांतर : अपत्याची लपविली माहितीलोकमत न्यूज नेटवर्कभिसी : ग्रामपंचायत भिसीचे सरपंच अरविंद रेवतकर यांनी ग्रामपंचायत सदस्य असताना तिसरे अपत्य असल्याचे दडवून खोटे शपथपत्र दाखल केल्याप्रकरणी नागपूर खंडपीठाने अरविंद रेवतकर यांना एक लाख पाच हजाराचा दंड ठोठावला. न्यायाधीश झेड. ए. हक यांनी ही रक्कम संबंधित प्रतिवादींना देण्याचे आदेश दिले.रेवतकर यांनी ग्रामपंचायत सदस्य असताना तिसरे अपत्य झाल्याची बाब लपवून ठेवल्याबद्दल धनराज मंगले यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे तक्रार दाखल केली. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रेवतकर यांना सदस्य म्हणून अपात्र घोषित केले. यानंतर त्यांनी उपविभागीय आयुक्तांकडे अपील केले. त्यांचे अपील उपविभागीय आयुक्तांनी नाकारले. यामुळे त्यांनी हायकोर्टाचे दार ठोठावले.नागपुरातील एका खासगी हॉस्पीटलमध्ये रेवतकर यांच्या पत्नीने मुलीला जन्म दिला. परंतु त्यांनी हायकोर्टात शपथपत्र दाखल करून तिसरे अपत्य झाले नसल्याची खोटी माहिती दिली. हायकोर्टाने संबंधित हॉस्पीटलच्या डॉक्टरला नोटीस बजावून माहिती मागितली. डॉक्टरने हायकोर्टाला माहित दिली की रेवतकर यांची पत्नी हॉस्पीटलमध्ये भरती होती आणि त्यांना तिसरी मुलगी झाली. तीन अपत्ये असल्यास निवडणूक लढविता येत नाही. असा कायदा असतानाही रेवतकर यांनी तिसऱ्या अपत्याची माहिती लपवून हायकोर्टाची दिशाभूल केली, असे अॅड. नितीन खांबोरकर यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. हायकोर्टाने रेवतकर यांच्यावर एक लाख पाच हजार रुपयांचा खर्च बसविला आणि जिल्हाधिकाऱ्यांना २५ हजार, उपविभागीय आयुक्तांना २५ हजार, तसेच ग्रामपंचायतीला ५० हजार, आणि डॉक्टरला पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिलेत.यासंदर्भात भिसी ग्रामपंचायतीचे सरपंच अरविंद रेवतकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून या घटनेविषयी विचारणा केली असता रेवतकर म्हणाले, नागपूर खंडपिठाने दिलेला निर्णय सत्य असून मी लवकरच सुप्रीम कोर्टात जाणार आहे. या प्रकरणामुळे सरपंच अरविंद रेवतकर यांच्या सरपंच पदावर गदा येणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भिसीच्या सरपंचांना लाखाचा दंड
By admin | Published: May 07, 2017 12:29 AM