प्रशासनाचे दुर्लक्ष : कायमस्वरूपी योजनेची गरजशंकर चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : पाणी टंचाईमुक्त गाव करण्यासाठी शासन पाण्यासारखा खर्च करीत असले तरी आजही अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत प्रतिनिधीने लेंडीगुडा या गावात भेट देऊन पाणी टंचाईचे उग्र रूप समोर आणले आहे. पावसाळा जवळ आला असला तरी तालुका प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची सोय केली नाही. केवळ उडवाउडवीचे उत्तर देत चालढकल केली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांना नाल्यातील दूषित पाण्यावर आपली तहान भागवावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.खडकी रायपूर ग्रामपंचायतीमधील लेंडीगुडा गावातील या छोट्याशा वस्तीत मागील चार महिन्यांपासून पाणी टंचाईची झळ बसत आहे. पाण्याचे स्त्रोत असलेले दोन्ही हातपंप बंद अवस्थेत आहे. वर्षभरापूर्वी कोसळलेल्या पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक विहिरीचे काम थंडबस्त्यात आहे. जवळपास पिण्याच्या पाण्याची कुठलीच सोय नाही. संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सांगूनही कुठलीच हालचाल केली जात नाही. त्यामुळे पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे. गावपातळीवरील समस्या व त्यांचे प्रश्न तातडीने सोडविता यावे, यासाठी शासनाने ग्रामपंचायतीची स्थापना केली आहे. पण या संस्थेलाच पिण्याच्या पाण्याचे गांभीर्य लक्षात येत नसेल तर जनतेनी न्याय कुणाकडे मागायचा, हा प्रश्न आहे.मागील अनेक वर्षापूर्वी जलस्वराज्य प्रकल्प, ग्रामीण पाणी पुरवठा यासारख्या महत्वाच्या योजना शासनाने राबविल्या. यात कोट्यवधी रुपये खर्च झाले. परंतु त्या योजनेतून घोटभर पाणीही प्यायला मिळाले नाही. काहीअंशी पिण्याच्या पाण्याची सोय होईल, असे वाटत होते. मात्र चुकीचे नियोजन आणि योजनेवरील तांत्रिक सल्लागाराचे अक्षम्य दुर्लक्ष व गावपातळीवरील हेवेदावे, यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी केलेला खर्च पाण्यात गेला असून पिण्याच्या पाण्याची समस्या कायम भेडसावत आहे.दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांना अनेक आजारवर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी अनेक वेळा मागणी केल्यानंतरही शासन प्रशासनाने घोटभर पाण्याची सोय करून देण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे येथील बांधवांना नाल्यात खड्डा खोदून दूषित पाणी पिऊन आपली तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे त्यांना अनेक आजारालाही बळी पडावे लागत असल्याचे बोलले जात आहे.
लेंडीगुड्यात खड्ड्यातील पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2017 12:36 AM