मागील तीन महिन्यांपासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे मंजुराच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे अनेक मंजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. या बाबीची दखल घेऊन वाढोणा ग्रामपंचायतचे सरपंच देवेंद्र गेडाम यांनी शनिवारी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मातीकामाला सुरुवात केली. सुरुवातीला ग्रामपंचायत वाढोणाअंतर्गत येत असलेल्या सर्व गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण होते. मात्र ग्रामपंचायतच्या योग्य नियोजनामुळे आज गावात एकही रुग्ण नाही. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून मंजुरांच्या हाताला काम मिळावे या हेतुने महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत तलाव खोलीकरण व तीन पांदण रस्त्याच्या कामाला सुरुवात केली.
विशेष म्हणजे गावातील ४६५ मंजुरांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे कामाची मागणी केली होती. एवढ्या मंजुरांना एका कामावर घेणे शक्य नाही. यामुळे सरपंच देवेंद्र गेडाम यांनी एकाच दिवशी चार ठिकाणी मातीकामे सुरू केली व योग्य नियोजन करून एका चमूमध्ये फक्त पाच मजुरांचा समावेश केला व एका चमूपासून दुसऱ्या चमूचे अंतर साधारणत: २० फूट लांब ठेवलेले आहे. यावेळी सरपंच देवेंद्र गेडाम, उपसरपंच भगवान बन्सोड, ग्रा. पं. सदस्य अनिल डोर्लीकर, वासुदेव मस्के आदी उपस्थित होते.