सिंदेवाही : शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान झालेल्या वादळामुळे अनेकांच्या घरावरील छप्पर उडाले. वीज खांब, शेकडो झाडे पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.तब्बल ३० मिनटे आलेल्या वादळामुळे शहरातील चायटपरी, खर्रा सेंटर, छोटे हॉटेल, फूटपाथ दुकानांचे मोठे नुकसान झाले. २५ ते ३० घरांची पडझड झाले. वादळामुळे पोलीस ठाण्यासमोरील वीज खांबाजवळ झाड कोसळल्याने वीज प्रवाह बंद झाला. जवळपास शेकडो वीज खांब कोसळले. वीज प्रवाह वेळेवर बंद केल्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. वीज तार संपूर्ण रस्त्यावर पसरल्या. दरम्यान शहरातील काही भागाचा वीज प्रवाह पूर्णत: बंद होता. या वादळाने तहसील कार्यालय, पंचायत समिती, रेल्वेविभाग परिसरात वृक्ष विद्युत खांबावर पडल्याने संपूर्ण सेवा बंद पडली. अनेक घरांवरील टिना, कवेल उडले. या वादळामुळे तीन जण जखमी झाले आहे. तर अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाने सर्व्हेक्षण करुन नुकसानग्रस्तांना मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान ग्रामीण भागातही अनेकांचे नुकसान झाले. सध्या शेतीचे कामे सुरु असून अनेक शेतकरी शेतात काम करीत असताना त्यांना वादळाचा फटका बसला. (शहर प्रतिनिधी)
वादळामुळे सिंदेवाहीत लाखो रुपयांचे नुकसान
By admin | Published: June 14, 2014 11:26 PM