राजू गेडाम
मूल (चंद्रपूर) : सैराट या बहुचर्चित चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा नवा मराठी चित्रपट ''घर, बंदूक, बिरयानी'' ७ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असून, यात मूल तालुक्यातील बेंबाळ येथील ललित मटाले हा महत्त्वाची भूमिका साकारत असल्याने झाडीपट्टीच्या रसिकांसाठी हा चित्रपट औत्सुक्याचा बनला आहे.
अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ नंतर येणारा ''घर, बंदूक, बिरयानी'' हा नागराज यांचा हा पुढचा चित्रपट असून, स्वतः नागराज यांनीसुद्धा यात महत्त्वाची भूमिका केली आहे. शिवाय सैराटमधील परशा म्हणजेच आकाश ठोसर, दक्षिणेतील हुकमी एक्का सयाजी शिंदे, सायली पाटील, तानाजी गलगुंडे असे मातब्बर कलावंत यात आहेत. चंद्रपूर येथे नुकतेच या चित्रपटाचे प्रमोशन झाले. त्यासाठी ही सर्व मंडळी चंद्रपुरात आली होती. त्यांच्यासह स्टेजवर ललितही होता. ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानाची आहे.
ललितचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण बेंबाळलाच झाले. आता त्याने अभिनयात पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. अभिनयाचे बाळकडू त्याला बेंबाळ गावातच मिळाले, असे तो मानतो. येथे झाडीपट्टीच्या नाटकांचे प्रयोग बघत तो वाढला. विवेकानंद विद्यालय, बेंबाळ येथे शिकताना गावातील नाटकांच्या तालमी व नाटक बघून शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आवडत्या कलावंताच्या तो नकला करायचा. पुण्यात काही वर्षे नाटकातून भूमिका केल्यानंतर बबन, अव्यक्त, मेडिसिन लॅम्प अशा काही चित्रपटातून त्याने अभिनय केला. आता तो नागराज मंजुळे यांच्या आटपाट प्रोडक्शन व झी स्टुडिओच्या बॅनरखाली काम करीत असल्याने झाडीपट्टीचा गौरव वाढला आहे.
नागराज मंजुळे हे नावच मुळात मराठी चित्रपटासाठी मैलाचा दगड आहे. या चित्रपटात नेमकं काय आहे, हे सांगायला नागराज यांनी नकार दिलाय. तरीही ट्रेलर बघून नागराज मंजुळे आणि हेमंत अवताडे यांचे हे कथानक डाकू आणि पोलिस यांच्यातील संघर्षावर असावे, असा अंदाज लावता येतो. त्यामुळे ''घर, बंदूक, बिरयानी'' या चित्रपटाची उत्सुकता तमाम झाडीपट्टीच्या रसिकांना लागली आहे.
ललित म्हणतो...
झाडीपट्टी रंगभूमी माझी प्रेरणा आहे. बेंबाळला असताना घनश्याम दयालवार यांच्या कॉमेडी रोलची नक्कल करायचा. पुढे किशोर उरकुंडवार यांच्या सानिध्यात कलेचे संस्कार झाले. त्यांची लेखन व नाटक बसविण्याची शैली मला प्रभावित करायची. नागराज मंजुळे यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. ते नवोदितांना मित्रांसारखे वागवतात. पुढे वास्तविक जीवनातील विविध पात्र रंगमंच व चित्रपटांतून साकारण्याची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया ललित मटाले यांनी लोकमतला दिली.