आरोपींमध्ये तत्कालिन भूमिअभिलेख कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
महेेंद्र राकेशसिंग ठाकूर यांच्या तक्रारनुसार, बल्लारपूर न. प. हद्दीतील सीटी सर्व्हे क्रमांक २८८ मधील ११.१० चौ.मी. जागा वडिलांची आजी स्व. तिलकुबाई बनवारीलाल सिंग यांच्या नावे आहे. परंतु, या जागेवर बल्लारपूर येथील इंद्रकूमार त्रिलोकाणी यांच्या कुटुंबीयांनी ताबा मिळविला. ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी भूमी अभिलेख कार्यालय बल्लारपूर येथील भूमापन क्रमांक २८८ या जागेची आखिव पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) नक्कल प्रत मिळविली. ही जागा तिलकुबाई बनवारीलाल यांच्याच नावे होती. त्यानंतर १५ एप्रिल २०११ रोजी पुन्हा आखिव पत्रिका प्रत पुन्हा मिळविली असता त्यामध्ये फेरफार क्रमांक ६३ दि. २ जानेवारी १९९० अन्वये इंद्रकुमार वरूमल तिलोकानी यांचे नाव चढविण्यात आल्याचे आढळले. तर वारसदार म्हणून ४ नोव्हेंबर २०१९ रोजी नरेंद्र इंद्रचंद तिलोकानी, दीपक इंद्रचंद तिलोकानी, सलोनी रवी बसंतवानी यांच्या नावाची नोंद आहे. सन २०१५ च्या शासकीय निर्णयानुसार, २० मे २०१५ रोजी फेरफार क्रमांक १६०६ प्रमाणे क्षेत्राची अक्षरी नोंद केली आहे. क्षेत्राच्या अंकी व अक्षरी नोंदीमध्ये खाडाखोड करून ११.१० चौ. मी. ऐवजी २४०.६१ चौ.मी. क्षेत्राची नोंद केली आहे. आखिव पत्रिकेत फेरफार क्रमांक ६३ अन्वये इंद्रकुमार तिलोकानी यांचे नाव चढविले. फेरफार क्र. ६३ ची कागदपत्रे भूमी अभिलेख कार्यालयातून मिळविली असता प्रत्यक्षात ६३ क्रमांकाचा फेरफार हा १२ सप्टेंबर १९८९ रोजीचा असून वीर नरसिंगराव आदिनारायण व इतरांच्या वाटणीपत्रा (विभागणी) बाबत आहे. नरेंद्र तिलोकानी, दीपक तिलोकानी, सलोनी बसंतवानी यांनी ३१ ऑक्टोबर २०१३ ते ४ नोव्हेंबर २०१९ या दरम्यान भूमी अभिलेख कार्यालयातील तत्कालिन अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून वडिलोपार्जित जागा स्वत:चे नावे करून आमची फसवणूक केली, अशी तक्रार महेेंद्र ठाकूर यांनी बल्लारपूर ठाण्यात केली. या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी चौघा आरोपींविरद्ध भादंवि १८६० अनुसार ४०९, ४२०, ४६५,६६, ६८, ७१, ३४ गुन्हा दाखल केला आहे.