लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारपूरच्या बीआयटी कॉलेजमधील रोजगार मेळाव्यात चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने मुलूख चांदा व हॅलो चांदा या दोन अॅपचा शुभारंभ केला.फॉर्च्यून फाऊंडेशनचे अध्यक्ष आमदार अनिल सोले यांनी या मेळाव्याच्या आयोजनामागची भूमिका मांडताना प्रत्येकाला नोकरी मिळेल, असे नाही. मात्र आजच्या मेळाव्यातून प्रत्येकाला भरपूर शिकायला मिळेल, हे मात्र निश्चित असल्याचे सांगितले. विविध आस्थापना या ठिकाणी आल्या असून मोठ्या प्रमाणात त्यांच्या मार्फत नोकरी दिली जाईल. या ठिकाणी युवकांसाठी आयोजित मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनीदेखील यावेळी युवकांना संबोधित केले. आमदार अॅड. संजय धोटे यांनी जिल्ह्यामध्ये निर्माण होत असलेल्या मोठमोठ्या पायाभूत सुविधांसाठी नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे सांगितले. बीआयटी प्रमुख अॅड. बाबासाहेब वासाडे यांनीदेखील या मेळाव्यात युवकांना संबोधित केले.जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील जनतेला सर्व शासकीय योजनांची माहिती व्हावी, व पर्यटनात अग्रेसर असणारा जिल्हा चंद्रपूरची त्या क्षेत्रात अॅपच्या माध्यमातून आगेकूच व्हावी, यासाठी अॅपची निर्मिती केली आहे. चंद्रपूर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत या अॅपची संकल्पना पूर्ण करण्यात येत असून नागरिकांच्या हातात आलेल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून जिल्ह्याची माहिती, योजनांची माहिती, लाभार्थ्यांसाठी असणाऱ्या योजना, त्यासाठीची पात्रता, त्याकरिता लागणाºया कागदपत्रांची माहिती, हातातील मोबाईलमध्ये उपलब्ध व्हावी आणि जिल्हा प्रशासनाचा थेट संवाद सामान्य नागरिकांशी प्रस्थापित व्हावा यासाठी हे अॅप सुरु करण्यात आला आहे.मुलुख चांदा हे अॅप चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यटनाला व सांस्कृतिक वारशाला लोकांपर्यंत पोचविण्याच्या कामात उपयोगी येणार आहे. तर हॅलो चांदा हे अॅप शासनाच्या विविध योजनांच्या संदर्भात माहिती देणारे आहे. सध्या प्राथमिक स्तरावर असणारे हे अॅप प्रशासनामार्फत लवकरच विकसित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांना आवश्यक माहिती आपल्या मोबाईलवरच मिळावी, ही यामागची भूमिका आहे. याशिवाय जिल्ह्यातील सर्वाधिक प्रभावी योजना असणारी १५५३९८ या टोल फ्री क्रमांकाची हॅलो चांदा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा देखील लवकरच यांच्यामार्फत अधिक सुलभ करण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत.जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत सप्टेंबर अखेरपर्यंत माफ करण्यात आलेले कर्ज व शेतकऱ्यांना या हंगामात देण्यात आलेल्या पीक कर्ज वाटपाबाबतची घरी पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे.याशिवाय अण्णासाहेब साहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यातर्फे जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या कर्जवाटपातबाबत माहिती देणाऱ्या घरी पुस्तिकेचे देखील प्रकाशन करण्यात आले. याशिवाय या रोजगार मेळाव्याचे वैशिष्ट्य असणारे सहा मिशनबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धोरणात्मक निर्णय उद्घाटनप्रसंगी जाहीर केले. यावेळी त्यांनी मिशन सेवा ,मिशन स्वयंरोजगार, मिशन कौशल्य, विकास ,मिशन फोरेन सर्विसेस, मिशन उन्नत शेती, मिशन सोशल वर्क, या सहा सूत्री कार्यक्रमाचा पुनरुच्चार केला. यापैकी एक असणाऱ्या मिशन सेवाच्या लोगोचाही शुभारंभ करण्यात आला. सीएमफेलो या मोहिमेवर काम करीत आहे.यावेळी मिशन सेवा अंतर्गत जिल्ह्यातील वाचनालयामध्ये उपलब्ध करण्यात येणाऱ्या पुस्तकांच्या संचाचे लोकार्पण करण्यात आले. जिल्हा ग्रंथालयामार्फत हा उपक्रम राबवला जाणार आहे. या कार्यक्रमात मुद्रा बँक योजनेसंदर्भातही मोठ्या प्रमाणात स्टॉल लावण्यात आलेले आहे. या ठिकाणी बँक काऊंटर उघडण्यात आले असून मुद्रा लोन संदर्भात यामध्ये मार्गदर्शन करण्यात येत आहे. या योजनेतून उद्योग व्यवसाय करणाºया दीडशे लोकांना कर्ज वितरीत केले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत आर्वे यांनी केले.
मुलूख व हॅलो चांदा अॅपचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 10:53 PM
बल्लारपूरच्या बीआयटी कॉलेजमधील रोजगार मेळाव्यात चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने मुलूख चांदा व हॅलो चांदा या दोन अॅपचा शुभारंभ केला.
ठळक मुद्देशासकीय योजनांची माहिती : मान्यवरांच्या उपस्थितीत अॅपला सुरुवात