जिवतीत घरांसह दुकानात घुसले पाणी
जिवती : शहरातील शेडमाके चौक ते तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर मोठा नाला आहे. या नाल्याला आलेल्या पुरामुळे लगतच्या अनेक घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरले. येथील जांबळे रेडिमेड कापड दुकान, दर्शन फोटो स्टुडिओ, गोरे संगणक ग्राहक सेवा केंद्र आणि घोडके संगणक ग्राहक सेवा केंद्र यांच्या दुकानात पाणी शिरले. त्यामुळे कापड दुकानातील कपडे वाहून गेले. एवढेच नाही तर ग्राहक सेवा केंद्रातील संगणक व पीसीओसुद्धा साचलेल्या पाण्यामुळे निकामी झाले आहेत. पावसामुळे तालुक्यातील अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
कोरपना तालुक्यात कपाशी, सोयाबीनचे उभे पीक झाले आडवे
कोरपना : मागील दोन दिवसांपासून कोसळलेल्या संततधार पावसाचा फटका शेतीला बसला आहे. कोरपना तालुक्यातील अनेक शेतात पाणी साचल्यामुळे उभे पीक आडवे झाले आहे, तर सोयाबीनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कोरोना संकटामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने शेती फुलविली. पीक चांगले आले. मात्र, पावसामुळे कपाशीचे उभे पीक आडवे झाले आहे.
कोरपना येथील शेतकरी दीपक पारखी यांच्या शेतातील कपाशीचेही मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, कोरपना तालुक्यात कपाशीसह सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. ‘औद्योगिक तालुका’ अशी ओळख असली तरी बहुतांश नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे शेतात पिकले तरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. मात्र, यावर्षी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांच्या वाढीसाठी शेतकऱ्यांनी खत, निंदण, खुरपण करून मोठ्या कष्टाने जपणूक केली. मात्र, हंगामाच्या सुरुवातीलच मोठा फटका बसला.
अमलनाला धरण विहंगमय
कोरपना : कोरपना, राजुरा आणि जिवती तालुक्यांच्या सीमेवर असलेले अमलनाला धरण ओसंडून वाहू लागले आहे. उद्योगांसह, शेतीला या धरणातून पाणीपुरवठा केला जातो.
धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, वर्षभर येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात.
बल्लारपुरात पुरातन किल्ल्याची भिंत कोसळली
बल्लारपूर : बल्लारशाह तालुक्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मात्र, पुरातत्व विभागाकडून या वारशाची योग्य देखभाल- दुरुस्ती केली जात नसल्यामुळे आता हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कालच्या पावसामुळे किल्ल्याची भिंत कोसळली. यामुळे आतातरी संवर्धन करण्याची मागणी होत आहे.
डोंगरगाव-डाम मार्ग बंद
राजुरा : तालुक्यातील डोंगरगाव- डाम मार्गावर डांबरीकरण करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना सुविधा झाली होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून कोसळलेल्या पावसामुळे हा डांबरी रस्ता अक्षरश: वाहून गेला आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठे भगदाड पडले असून, वाहतुकीसाठी मार्ग बंद झाला आहे.
घराची भिंत कोसळली
राजुरा : तालुक्यातील काही गावांतील घरांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, देवाडा येथील घरांची पडझड झाली आहे. शासनाने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सावलहिला नाल्यावरील रपटा गेला वाहून
कोरपना : कोरपना तालुक्यातील खैरगावकडून सावलहिरा गावाकडे जाणाऱ्या नाल्यावर असलेला रपटा गुरुवारी वाहून गेला. यामुळे परिसरातील नागरिकांना जाण्या- येण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. विशेष म्हणजे, नाल्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात शेती आहे. सध्या हंगामाचे दिवस असल्यामुळे शेतऱ्यांनाही यामुळे त्रास होणार आहे. या नाल्यावर बांधकाम विभागाकडून पूल बांधण्यात येत आहे. मात्र, बांधकाम अर्धेच झाले आहे.
धाबा-पोळसा रपटा गेला वाहून
धाबा : गोंडपिपरी तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा धाबा- पोडसा या मार्गावरील असलेल्या नाल्यावरील रपटा वाहून गेला. या मार्गावरील हेटीनांदगाव, चकमूर येथीलही रस्ते वाहून गेले. यामुळे दोन गावांतील संपर्क तुटला आहे. नाल्याला मोठ्या प्रमाणात प्रवाह असल्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, नवा रपटा बनविण्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे. या नाल्यावर मोठा पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस त्रास सहन करावा लागणार आहे.
विसापूर परिसरात शेतात पाणी
विसापूर : विसापूर परिसरात असलेल्या नाल्यामुळे अनेक शेतात पाणी शिरले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, शेतकरी हतबल झाले आहे.
जाळीच्या कुंपणासह हळदपिकाचे नुकसान
नांदा : येथील शेतकरी ठणू पाचाभाई यांंचा शेतातील हळद, सोयाबीन पीक वाहून गेले. विशेष म्हणजे, त्यांनी शेताला कुंपण केले होते. या कुंपणाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी शेताची पाहणी केली. शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.