लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. रविवारी दिवसभर पावसाने उसंत दिली नाही. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. कोरपना-आदिलाबाद हा राज्यमार्ग, तसेच चिमूर-वरोरा हा रस्ता बंद पडला आहे. जिवती तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांत पाणी घुसले, तर चिमूर तालुक्यातील पळसगाव येथे भिंत कोसळली. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, चंद्रपूर शहरातही जलमय स्थिती बघायला मिळाला. अनेक सकल भागांमध्ये पाणी साचले.कोरपना-आदिलाबाद या राज्य मार्गावरील कन्हाळगाव येथील नाल्याला पूर आला आहे. परिणामी, हा मार्ग बंद आहे. परसोडा नाल्यावर पाणी आल्याने, तसेच जांभूळझरा-मांडवा मार्गही बंद आहे. कोरपना तालुक्यातील पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातही नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. गांगलवाडी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सिंदेवाही तालुक्यातही हिच स्थिती आहे. चिमूर तालुक्यातील पळसगाव (पिपर्डा) येथील सीताराम गुरुनुले यांच्या घराची भिंत कोसळली. यामुळे संसारोपयोगी साहित्य मातीत दबले. मूल तालुक्यातही नद्या, नाल्या दुथडी भरून वाहत आहे. या परिसरात ७० टक्के पेरण्या आटोपल्या आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे पेरलेले बियाणे कुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिवती तालुक्यात पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे.