घुग्घुस : येथील अमराही वार्डामधील निराधार महिलेचे घर तीन महिन्यांपूर्वी शॉर्टसर्किटने जळून राख झाले. तिला राहण्यासाठी निवारा नाही. घरातील अन्नधान्य, कापडे, अत्यावश्यक सर्व वस्तू आणि मोलमजुरी करून जमा केलेली रक्कम त्या आगीत स्वाहा झाली. नझुलच्या जागेवर घर असल्याने शासकीय मदत मिळणार नाही, असे बोलले जात होते. घुग्घुस काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांनी तिची भेट घेऊन घर बांधून देण्याचा शब्द दिला. इतकेच नव्हे, तर दोन खोल्या बांधून दिल्या व नवनिर्माण घर तिच्या स्वाधीन केले.
भागरथा शिडाम ही नेहमीप्रमाणे १० फेब्रुवारीला सकाळी १० वाजता मजुरीसाठी घरून बाहेर गेली. अशातच शॉर्टसर्किट होऊन घराला आग लागली. शेजारच्यांनी आग विझविली. दरम्यान, घरासह घरातील साहित्य आगीत जळून राख झाले होते.