जिल्ह्यात सर्वदूर पाऊस : शेतकऱ्यांना आनंदलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला वरूणराजाने दिलासा दिला आहे. कालपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू असून सतत सरीवर सरी बरसत आहेत. या पावसाने शेतकऱ्यांत आनंद पसरला असला तरी पाऊस अद्याप थांबलेला नसल्याने पेरणीची कामे तुर्तास थांबलेली आहेत. हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवत अनेक शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच पेरणी केली. मात्र पावसाने दगा दिला आणि पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला. गेल्या एक महिन्यापासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. चार दिवसांपुर्वी चंद्रपुरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र उर्वरीत तालुक्यात पाऊस झाला नाही. त्यानंतर चार-पाच दिवस कडक उन्ह तापली आणि उकाडा वाढला होता. त्यामुळे शेतकरी विवंचनेत सापडले. तर काही शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले.मात्र रविवारपासून जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस सुरू असून सरीवर सरी बरसत आहेत. त्यामुळे जमिनीत बऱ्यापैकी ओलावा झाला आहे. सोमवारीही जिल्ह्यात दमदार पाऊस सुरूच होता. दोन दिवसांपासून कधी मोठा तर कधी रिमझिम पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करणे थांबविले आहे. आता पावसाने सवलत दिल्यास पेरणीच्या कामाला वेग येणार आहे.
अखेर बरसल्या सरीवर सरी
By admin | Published: June 27, 2017 12:40 AM