लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेदिवस मोठ्या प्रमाणात वाढत होत आहे. यामुळे उपसंचालक ( बफर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या बफर वनपरिक्षेत्रातील मामला गेट नव्याने सुरू करण्यात आला. उदघाटन डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या हस्ते आज पार पडले.यावेळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (बफर) चे उपसंचालक जी. गुरुप्रसाद, सहाय्यक मुख्य वनसंरक्षक कुलकर्णी, आरएफओ राठोड, जिल्हा परिषद सदस्य निमगडे, पंचायत समिती सदस्य सिंधू लोनबळे, शैलेंद्र्र बैस, इको विकास समिती मामला येथील अध्यक्ष भारत कोटरंगे, इको विकास समिती चोरगावचे अध्यक्ष राजु वाटगूरे, वनविभागाचे कर्मचारी, गावकरी व पर्यटक उपस्थित होते. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी मार्गदर्शन करताना पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून गावातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल चंद्रपूर ते मामला बससेवा सुरु झाल्यास आणखी पर्यटकात वाढ होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (बफर) चे उपसंचालक गुरुप्रसाद यांनी या पर्यटन क्षेत्रात पर्यटकांना जैवविविधतेचा व वन्यजीवांचा अभ्यास करता येईल तसेच वन्यप्राणी दर्शनाचा आनंद घेवू शकतील. कोअर वनक्षेत्राचा भार कमी करण्यासाठी मामला, सिरकाडा, पांगडी अशी तीन गेट सुरू करण्याचा निर्णय वनप्रशासनाने घेतला आहे. यासोबतच आणखी काही गेट सुरू करण्याचे नियोजन वनप्रशासनाने केले आहे. या माध्यमातून गावातील स्थानिक ३० ते ३५ बेरोजगार युवकांना रोजगार प्राप्त झाला आहे.यामध्ये जिप्सी, गाईड, टिकीट काउंटर, वॉचमन यांचा समावेश आहे. या तीन गेटच्या माध्यमातून जवळपास १०० बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार आहे. अशा प्रकारे पर्यटन क्षेत्रातून अधिकाधिक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा या मागील उद्देश असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.
ताडोबातील मामला गेटचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 10:59 PM