तीन दिवस आयोजन : चंद्रपुरात भक्तिमय वातावरणचंद्रपूर : नारायण सेवा संस्था, माहेश्वरी महिला मंडळ व माहेश्वरी युवक मंडळ यांच्या वतीने येथील न्यू इंग्लीश हॉयस्कूलच्या पटांगणात तीन दिवशीय ‘नानीबाई रो मायरो’ या कथामय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आज रविवारी या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे चंद्रपूरकर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले.या तीन दिवशीय नानाबाई रो मायरो कथेत दररोज दैनंदिन दिनचर्येशी जुळलेल्या लहानसहान गोष्टींना कथेच्या स्वरुपात मांडून प्रवचन केले जाणार आहे. या कार्यक्रमानिमित्त राधास्वरुप पूज्य जया किशोरीजी यांचे चंद्रपुरात प्रथमच आगमन झाले आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्ष आनंदी सारडा व माहेश्वरी युवक मंडळाचे अध्यक्ष सुरेश राठी यांनी राधास्वरुप पूज्य जया किशोरीजी यांना पारंपारिक राजस्थानी पगडी घालून त्यांचे स्वागत केले. कथेचे पहिले पुष्प गुंफताना जया किशोरीजी यांनी गुजरातचे संत नरसी मेहता यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी त्या म्हणाल्या, आजच्या युवा पिढीत सहनशिलतेची कमी आहे. येथे कोणीच शांत बसायला तयार नाही. कौटुंबिक विवादात सासू व सुनेपैकी कोणी एकाने शांत होत मौन धारण केले तरी कुटुंब सावरू शकते आणि घरात शांतता नांदू शकते. सत्संगात येऊन त्यातील एकही चांगली गोष्ट शिकली नाही तर सत्संगाचा लाभ काय, असा प्रश्नही त्यांनी आपल्या प्रवचनातून उपस्थित केला.यावेळी राधास्वरुपा पूज्य जया किशोरीजी यांनी कथेदरम्यान आपल्या सुमधूर वाणीने भजने गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्रास्ताविक सुरेश राठी यांनी तर, संचालन कुंजबिहारी मिश्रा यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
‘नानीबाई रो मायरो’ कथेचा शुभारंभ
By admin | Published: November 23, 2014 11:16 PM