विकास खोब्रागडे
पळसगाव (पिपर्डा) : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे सर्व कामे ठप्प पडली आहेत. ग्रामीण भागातील लोकांचा रोजगार बुडाला आहे. अशातच पळसगाव वनपरिक्षेत्रातील आठ गावांमध्ये सोमवारपासून तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू झाल्याने हातावर पोट असणाऱ्या मजुरांना बिकट स्थितीत मोठा दिलासा मिळाला आहे.
पळसगाव वनपरिक्षेत्रातील जंगलालगत असलेल्या पळसगाव पिपर्डा, पारणा, गोंडमोहाळी, बेलारा, विहिरगाव,
मदनापूर, करबडा या गावांतील मजूरवर्गाला रोजगार मिळाला आहे. जंगल परिसरतील भागात नागरिक मोठ्या प्रमाणात तेंदूपत्ता संकलन करतात. त्यामुळे मागील दीड दोन महिन्यांपासून घरी बसलेल्या लोकांना त्यांच्या हाताला काम मिळाले आहेत. शारीरिक अंतर राखून नागरिकांनी तेंदूपत्ता संकलन करण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
प्रति तेंदूपुड्याला मिळतात २२७ रुपये प्रति शेकडा
तेंदूपत्ता संकलनाकरिता २२७ रुपये मंजूर असून गावकरी स्वखुशीने तेंदूपत्ता संकलनाचे काम करीत आहेत. कोविड १९ च्या अनुषंगाने अटी व शर्तीनुसार तेंदूपत्ता संकलन करावे लागणार आहे.
कोट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. मात्र, गावातील मजुरांच्या हाताला काम नाही. सदर कंपनीचे चेकर, मजूर हे जिल्ह्यातीलच आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन ठेवून तेंदूपत्ता संकलनाचे केंद्र सुरू झाले आहे.
- सरिता विकास गुरनुले,
सरपंच, ग्रामपंचायत, पळसगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये. यासंदर्भात दक्षता घेण्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना आहेत. खबरदारी घेऊन तेंदूपत्ता संकलन करण्यास काही अडचण नाही. कंत्राटदारानी मजुरांची काळजी घेऊन संकलन केंद्र सुरू झाले आहे.
- आर. एन. ठेमस्कर, वनपरिक्षेत्र अधिकारी, पळसगाव वनपरिक्षेत्र, ता. चिमूर.