लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’ असा संदेश दिला. मात्र, आजच्या स्थितीमध्ये लोक गावाकडून शहराकडे धाव घेत आहे. त्यामुळे गावांचा विकास खुंटला आहे. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी गावांच्या विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. याच उद्देशाने गांधी जयंतीनिमित्त ‘समस्यामुक्त गाव’ अभियान सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाने गावातील नागरिकांच्या दारात जाऊन समस्यांची माहिती घ्यावी आणि त्याचे त्वरित निराकरण करावे, असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.सावली तालुक्यातील पालेबारसा येथे ‘समस्यामुक्त गाव’ अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्ह्याधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, सावली पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संदीप गड्डमवार, राजू सिद्धम उपस्थित होते. या परिसरात कार्पेट क्लस्टरसाठी ८.५० कोटी रुपये देण्यात आले आहे. यातून १२०० महिलांना रोजगार मिळणार आहे. सिंचनाच्या उपलब्धतेमुळे धान उत्पादनाबरोबरच येथील शेतकरी दूध उत्पादक होईल. पुढील दोन वर्षांत दहा हजार शेतकऱ्यांच्या दारात दुधाचे उत्पन्न सुरू होईल. तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांना रोवण्यासाठी थेट निधी देण्याचा प्रस्ताव आहे, असेही ना. वडेट्टीवार म्हणाले. जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, स्थानिकांच्या समस्या गावातच सोडवण्याच्या या कार्यक्रमाचा उद्देश आहे. सावली तालुक्यात १६ हजार ३०० लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेअंतर्गत १.७५ कोटी रुपये, नगर परिषदांना २.३१ कोटी रुपये देण्यात आले. सार्वजनिक आरोग्य संस्थांना फायर फायटिंगसाठी १.२८ कोटी रुपये रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
विविध विभागांचे अधिकारी गावाततालुका प्रशासनाला प्राप्त तक्रारींचे पालकमंत्र्यांनी तत्काळ निराकरण करून जागेवरच समस्या मार्गी लावल्या. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पाटबंधारे विभाग, कृषी विभाग, विद्युत विभाग, महसूल विभाग आदी विभागांना नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्याचे निर्देश दिले. तसेच काही समस्यांचे पालकमंत्र्यांनी जागेवरच निराकरण केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
परिसरातील गावांच्या विकासाचा आराखडा- परिसरातील गावाच्या विकासासाठी आराखडा मंजूर करण्यात आला आहे. रस्ते, पूल, तलाठी कार्यालय, शाळांचे संरक्षण भिंत, विविध गावांत अंगणवाड्यांचे बांधकाम, नळयोजना आदींसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच सिंचनासाठी या परिसराला १०६ कोटी नव्याने उपलब्ध करून देण्यात आले आहे.
पालकमंत्र्यांनी घरोघरी जाऊन जाणून घेतल्या समस्यायाप्रसंगी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी गावात नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन संवाद साधला. गावातील समस्यांचे जागेवर निराकरण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पंचायतराज व्यवस्थेत ग्रामसभेला सर्वोच्च अधिकार देण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, गावातील लोक अतिशय हालाखीच्या अवस्थेत राहतात. या वेदना जाणून घेण्यासाठी व गावातील समस्या सोडविण्यासाठी संपूर्ण प्रशासन येथे आले आहे, असेही ते म्हणाले.