लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : गडचांदूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व पिरिपा आघाडीने नगराध्यक्ष पदासह ९ नगरसेवक निवडून बहुमत सिद्ध केले आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत काँग्रेसच्या सविता सुरेश टेकाम यांनी भाजपच्या रंजना सुधाकर मडावी यांचा सरळ लढतीत ११०४ मतांनी पराभव करून विजय संपादन केला. नगरसेवकाच्या १७ जागांपैकी आघाडीत काँग्रेस ५ व राष्ट्रवादी काँग्रेसने ४ जागांवर विजय मिळवून बहुमताचा आकडा गाठला. शिवसेनेने ५ जागा बळकावत जोरदार मुसंडी मारली, तर भाजपला केवळ २ आणि शेतकरी संघटनेला एका जागेवरच समाधान मानावे लागले. वंचित बहुजन आघाडी, गोंडवाना गणतंत्र पार्टी व संभाजी ब्रिगेड व मनसेला भोपळाही फोडता आला नाही. निकाल जाहीर होताच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व पिरिपा आघाडीच्यावतीने शहरातून विजयी रॅली काढण्यात आली.गडचांदूर नगर परिषदेतील १७ जागांसाठी बुधवारी मतदान झाले होते. गुरूवारी मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व पिरिपाने आघाडी केली होती. भाजप स्वतंत्र लढली. तर शिवसेना, शेतकरी संघटना, गोंडवाना गणतंत्र पार्टी व संभाजी ब्रिगेडची युती होती. वंचित बहुजन आघाडीसह मनसेनेही उमेदवार रिंगणात उतरविले होते. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत काँग्रेसच्या सविता टेकाम (५०४७ मते) यांनी भाजपच्या रंजना सुधाकर मडावी (३९४३ मते) यांच्यावर ११०४ मतांनी विजय संपादन केला. शिवसेनेच्या उमेदवार संध्या गजानन मेश्राम ३०४७ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर होत्या.नगरसेवक पदाच्या १७ जागांसाठी विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष असे एकूण ९१ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत होते. प्रभाग १ मध्ये दोनपैकी काँग्रेस व भाजपने समान यश संपादन केले. काँग्रेसच्या अर्चना शिवाजी वांढरे यांनी भाजपच्या नीता विलास क्षीरसागर यांच्यावर १३९ मतांनी विजय मिळविला. भाजपचे रामसेवक सटूजी मोरे यांनी काँग्रेसच्या शेख अहमद शेख रफिक यांच्यावर १५२ मतांनी विजय मिळविला. प्रभाग २ मध्येही काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविला. काँग्रेसच्या जयश्री राहुल ताकसांडे यांनी भाजपच्या मंदा चंदू कस्टिकर यांच्यावर ५५ मतांनी मात केली, तर भाजपचे अरविंद तुकाराम राम डोहे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आकाश नामदेव वराटे यांच्यावर ११३ मतांनी विजय नोंदविला. प्रभाग ३ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पना अरुण निमजे यांनी भाजपच्या शितल सुनील धोटे यांच्यावर १२३ मतांनी, तर काँग्रेसचे विक्रम नामदेवराव येरणे यांनी शिवसेनेचे धनंजय सोहनलाल छाजेड यांच्यावर १३८ मतांनी विजय मिळविला. याच प्रभागात भाजपचे नगर पालिकेतील गटनेते निलेश ताजणे यांना तृतीय क्रमांकाची मते प्राप्त झाली असून त्यांचा दारुण पराभव झाला. प्रभाग ४ मध्ये दोन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा राहिला. राकाँच्या अश्विनी सचिन कांबळे यांनी भाजपच्या किरण गंगाधर खंडाळे यांच्यावर ८४ मतांनी, तर राकाँचे शरद सुरेश जोगी यांनी भाजपचे संदीप नत्थूजी शेळके यांच्यावर ३१५ मतांनी विजय संपादन केला. प्रभाग ५ मध्ये काँग्रेस व शिवसेनेने प्रत्येकी एक जागा जिंकली. काँग्रेसचे अरविंद सुभाष मेश्राम यांनी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महेश नारायण परचाके यांच्यावर १४८ मतांनी मात केली. तर शिवसेनेच्या वैशाली सुनील गोरे यांनी कॉंग्रेसच्या सविता रमेश चुधरी यांचा ८५ मतांनी पराभव केला. प्रभाग ६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने प्रत्येकी एका जागेवर विजय संपादन केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिनाक्षी अशोक एकरे यांनी शेतकरी संघटनेच्या विमल वामन बोर्डे यांचा ३९१ मतांनी पराभव केला. तर शिवसेना उमेदवार शेख सरवर शेख शालू यांनी काँग्रेसच्या चेतन मधुकर शेंडे यांच्यावर ६२ मतांनी विजय मिळविला. प्रभाग ७ मध्ये काँग्रेस आणि शेतकरी संघटनेने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविला. काँग्रेसचे राहुल नारायण उमरे यांनी शेतकरी संघटनेचे श्रीकांत नामदेव घोरपडे यांच्यावर १६० मतांनी विजय मिळविला. तर शेतकरी संघटनेच्या राजेया सुलतान शेख ख्वाजा यांनी मनसेच्या ज्योती महालिंग कंठाळे यांचा ७० मतांनी पराभव केला. प्रभाग ८ मध्ये शिवसेनेने तीनही जागांवर विजय मिळविला.शिवसेनेच्या सुनिता बंडू कोडापे यांनी भाजपच्या संगीता मुरलीधर आत्राम यांचा २८ मतांनी पराभव केला. शिवसेनेचे सागर सुरेश ठाकुरवार यांनी भाजपचे शंकर कवडू आकापूरकर यांचा १७१ मतांनी पराभव केला तर शिवसेनेच्या किरण सुधाकर अहिरकर यांनी भाजपच्या सपना निरज सेलोकर यांचा १६३ मतांनी पराभव केला. या प्रभागामध्ये काँग्रेसच्या तीनही उमेदवारांना क्रमांक तीनची अशी मते प्राप्त झाली. निकाल जाहीर झाल्यानंतर गडचांदूरात काँग्रेस, राकाँचे व पिरिपाच्यावतीने विजयी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, राष्ट्रवादीचे राजुरा विधानसभा प्रमुख अरुण निमजे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठल थिपे, काँग्रेसचे माजी सभापती नोगराज मंगरूळकर, नगर परिषदेचे माजी गटनेते पापय्या पोन्नमवार, हंसराज चौधरी, धनंजय गोरे, सुधाकर परसुटकर, नामदेव येरणे, विठ्ठल गोरे, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आशिष देरकर, निमणीचे उपसरपंच उमेश राजूरकर, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव शैलेश लोखंडे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष एजाज अहमद, अनिल निवलकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष रोहित शिंगाडे, प्रवीण खाडे, रुपेश चुधरी, सतीश बेतावार, नामदेव येरणे, प्रितम सातपुते, बंडू धोटे, प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी, प्रा. डॉ. सुनिल बिडवाईक व सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.सुभाष धोटे यांनी एकांगी मैदान मारलेराजुरा विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सुभाष धोटे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून यशस्वी खिंड लढविली. भाजपकडून प्रचंड मोठी यंत्रणा या निवडणुकीसाठी कामाला लागली होती. भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हेसुद्धा या निवडणुकीवर बारीक लक्ष ठेवून होते. यासोबतच शेतकरी संघटनेने नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप हे शिवसेना, गोंडवाना गणतंत्र पार्टी व संभाजी ब्रिगेड अशी आघाडी करून रणांगण गाजवत होते. तर आघाडीकडून नियोजनबद्ध रणनिती आखून आमदार सुभाष धोटे यांनी एकांगी लढा देत मैदान मारले.पाच वर्षांत असे घडले राजकीय नाट्य२०१५ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ७, काँग्रेस ५, शिवसेना २ व भाजप ३ असे पक्षीय बलाबल होते. या आधारावर पहिल्या अडीच वर्षांच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती. नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या विद्या कांबळे यांची वर्णी लागली होती. तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे होते. अडीच वर्षांनंतर पुन्हा सत्तेचे समीकरण बदलले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन काबीज केली होती. यामध्ये नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयालक्ष्मी डोहे विराजमान झाल्या होत्या तर उपाध्यक्षपद भाजपला मिळाले होते. विद्यमान स्थितीत राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला दूर ठेवून आघाडी करून निवडणूक लढली व जिंकली हे विशेष.
कठोर परिश्रमानंतर गडचांदूर ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतरण करण्यात यश आले. जनतेने विश्वास ठेवून न. प. निवडणुकीत काँग्रेस- राकाँ आघाडीला सत्ता दिली. विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येणार आहेत.-सुभाष धोटे, आमदारजनतेने मला प्रचंड बहुमताने निवडून दिले. सामान्य जनतेच्या कल्याणासाठी या पदाचा उपयोग करणार आहे. विविध विकासकामे गतिमान करण्यासाठी मी प्राधान्य देणार आहे.-सविता टेकाम, नवनिर्वाचित नगराध्यक्ष,