राजकीय अस्तित्वाचा प्रश्न : आरक्षणाने बिघडविले पुढाऱ्यांचे समीकरणघनश्याम नवघडे नागभीडप्रतिकूल आरक्षण आल्याने येथील काही नेत्यांना स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी सुरक्षित गटात किंवा गणात निवडणुकीचे ‘सर्जिकल आॅपरेशन’ करावे लागणार आहे. यात भाजप आणि काँग्रेस या पक्षातील नेत्यांचा समावेश राहणार आहे.नागभीड तालुक्यात येणारा वर्ष निवडणूक वर्ष आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक व नागभीड नगर परिषद आदी स्थानिक स्वराज्य व सहकारी संस्थांच्या निवडणुका नागभीड तालुक्यात याच वर्षात येणार आहेत. यापैकी अनेकांचा डोळा नगरपरिषद आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीवर होता. पण आश्चर्य असे की या दोन्ही स्वराज्य संस्थांचे आरक्षण अनेकांना प्रतिकूल आहे. त्यामुळे अनेकांवर राजकीय वनवासाची पाळी आली आहे. हे राजकीय वनवास टाळण्यासाठी यातील काहींनी राजकीय सर्जिकल आॅपरेशन करण्याची तयारी चालविली आहे.मिळालेल्या संकेताप्रमाणे येथील जिल्हा भाजपाचे महामंत्री संजय गजपुरे अनेक दिवसांपासून राजकारणात आहेत. पण एक अपवाद वगळला तर सार्वत्रिक निवडणुकीचा राजकीय जुगार ते कधीही खेळले नाही. म्हणूनच येथे नव्यानेच स्थापन झालेल्या नगरपरिषदेवर त्यांचा डोळा होता. पण झाले उलटे. येथील नगराध्यक्ष पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. म्हणूनच त्यांनी आता आपला मोर्चा लगतच्या पारडी- मिंडाळा या जिल्हा परिषद गटाकडे वळविला आहे.गजपुरे यांच्याप्रमाणेच काँग्रेसचे दिनेश गावंडे हेसुद्धा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते. पण आलेल्या आरक्षणाने त्यांचाही हिरमोड झाला आहे. आता गावंडे एक तर पारडी- मिंडाळा या जिल्हा परिषद गटाची निवड करतील किंवा पारडी व कान्पा या दोन गणांपैकी एका गणाला प्राधान्य देतील, हे तुर्तास त्यांनाच ठाऊक. जिल्हा परिषदेचे विद्यमान सभापती ईश्वर मेश्राम यांचा गृह गट हा अनुसूचित जमातीकरिता आरक्षित झाला आहे. त्यांनाही आपले राजकीय अस्तित्व कायम ठेवायचे आहे. यासाठी ते त्यांच्या पत्नीला या गटातून राजकीय मैदानात उतरवतात की स्वत: अन्य गटाची किंवा गणाची निवड करतात, यावरही बऱ्याच चर्चा रंगत आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल खापर्डे हे तालुक्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ. मौशी- कान्पा आणि पारडी- मिंडाळा या दोन गटापैकी एक तरी गट त्यांना अनुकूल येईल, कशी त्यांची अपेक्षा होती. पण हे दोन्ही गट त्यांच्यासाठी प्रतिकूल आल्याने त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. तुर्त ते ‘नाही’ म्हणून असले तरी पं.स. चे दोन गण या तालुक्यात अनुकूल आहेत. यापैकी ते एकाची निवड करतील. नाही तर ते आपला मोर्चा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे वळवतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
नेत्यांचेही आता ‘सर्जिकल स्ट्राईक्स’
By admin | Published: October 16, 2016 12:44 AM