सुधीर मुनगंटीवार : उमेदचा एकदिवसीय महोत्सव
मूल : बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांसोबतच इतरही साहित्याची मागणी वाढलेली आहे. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंसहायता समूह निर्माण झाले असून, ग्रामीण भागात महिलांनी स्वयंरोजगारात मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असल्याचे मत माजी मंत्री तथा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मूल व वृंदावन प्रभासंघ डोंगरगाव यांच्यावतीने पंचायत समिती मूल येथील एकदिवसीय महोत्सवादरम्यान बोलत होते.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनूले, मूल पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, उपसभापती जयश्री वलकेवार, सदस्य पूजा डोहने, मूल पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी डॉ. मयूर कळसे, जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन ताजने, जिल्हा व्यवस्थापक रोशन साखरे, पोंभुर्णा तालुका अभियान व्यवस्थापक राजेश दुधे, मूल तालुका अभियान व्यवस्थापक माया सुमटकर, वृंदावन प्रभाग संघाच्या अध्यक्ष आरिफा भसारकर, तुलसी प्रभाग संघाच्या सुवर्णा आकनपल्लीवार, यशस्वी प्रभाग संघाच्या कोषाध्यक्ष सुनंदा वनकर उपस्थित होते.
या महोत्सवात सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला, गांडूळ खत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र, पुरणपोळी, दंतमंजन, मशरूमपासून तयार केलेल्या विविध वस्तू, घरगुती शोभेच्या वस्तू, मिरची पावडर, हळद पावडर, ब्लॅक राईस ठेवण्यात आले होते.