गेवरा : सावली वनपरीक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पाथरी उपवन क्षेत्रातील गेवरा बीट क्रमांक १५६ मध्ये वनमजुरावर पट्टेदार वाघाने हल्ला करून जखमी केले. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली.
कृष्णा डंबाजी बानबले (३९) असे जखमी मजुराचे नाव आहे. तो गेवरा खुर्द येथील रहिवासी आहे. जखमीला उपचाराकरिता गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलेले आहे. सावली येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या पुढाकारातून तालुक्यातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात सावली येथे वन विभागासोबत शेतकऱ्यांची समन्वय बैठक घेण्यात आली होती. त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांनी सुचविलेल्या उपाययोजना अमलात आणून वनविभागाने गेवरा बिटाअंतर्गत गेवरा ते करोली रोड लगत असलेली झुडपे कटाई करण्याकरिता मजूर लावलेले होते. झुडपे कटाई करीत असतानाच गेवरा बीट क्रमांक १५६ मध्ये वन मजुरावर पट्टेदार वाघाने हल्ला चढविला. त्याने आरडाओरड केल्याने सोबतीला असलेले मजूर धावत आले, मजुराला वाघाच्या तावडीतून सोडविले. घटनास्थळी सावलीचे वनपरीक्षेत्र अधिकारी व्ही. बी. कांबळी, पाथरीचे क्षेत्र सहायक वासुदेव कोडापे यांनी भेट दिली.