घरटे बांधले : जखमी गरुडावर केला तातडीने औषधोपचारनागभीड : आकाशात ‘झेप’ घेण्याची ओढ त्याच्या रक्तातच असली तरी अचानक झालेल्या दुखापतीमुळे अस्थिपंजर झालेल्या त्या गरुडाला येथील ‘झेप’ या निसर्ग संस्थेने कसे जीवदान दिले.गरुडाची गगणभरी सर्वांनाच ज्ञात आहे. त्याच्या या गगणभरारीला कोणताही पक्षी शह देऊ शकत नाही. असाच हा गरुड आकाशात गगणभरारीसाठी झेपावत असताना त्याला कशाचा तरी अटॅक झाला आणि तो खाली पडला. अतिशय गंभीर जखमी अवस्थेत तो तसाच अऱ्हेर नवरगाव येथील नालीत पडून राहिला.शुक्रवारी सकाळी गावकऱ्यांच्या नजरेस ही बाब आली. त्यांनी लगेच त्याला बाहेर काढले. त्याच सुमारास झेप निसर्ग संस्थेचे सदस्य व शिक्षक अऱ्हेर येथे पोहचले. गावकऱ्यांचा घोळका पाहून ते त्या दिशेने गेले असता गरुड पक्षी त्यांच्या नजरेस पडला. त्यांनी तो गरुडपक्षी ताब्यात घेतला. शाळेतील कार्यक्रम आटोपून ते तडक नागभीड येथे आले. प्रथम त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी आणि वनविभागास या गरुडाची माहिती दिली. लागलीच ‘झेप’चे पवन नागरे, अमित देशमुख, सतीश चारथळ, समीर भोयर, मंगेश फुकट या सहकाऱ्यांना माहिती दिली. सर्व एकत्र आले. अतुल येरमे यांना उपचारासाठी बोलाविण्यात आले. येरमे यांनी उपचार केल्यानंतर आता हा गरुड एकदम टवटवीत झाला आहे.झेपचे हे कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी या गरुडाला साजेल असे एक घरटे पण तयार केले आहे. तो एकदम ठणठणीत होईपर्यंत त्याची काळजी घेणार आहेत. वन्यजीव सप्ताह सुरू असताना त्या गरुडाला वाचविल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावरुन ओसंडत आहे. (तालुका प्रतिनिधी)
आकाशी झेपावणाऱ्या गरुडाला ‘झेप’कडून जीवदान
By admin | Published: October 05, 2015 1:27 AM