ब्रह्मपुरी : ग्रामपंचायती चे निकाल लागल्यानंतर म्हणजे १५ जानेवारीनंतर सरपंचपदाचे आरक्षण सोडत काढावी असे आदेश ग्रामविकास विभागाने दिली आहे. त्यामुळे गावाचा प्रमुख कारभारी होण्याची मनीषा बाळगून असलेल्या उमेदवारांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ६२९ ग्रामपंचायतीचा बिगुल वाजला आहे. त्यात ब्रह्मपुरी तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यामुळे राजकीय पक्षांनी गावपातळीवर आघाड्या व युतीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. तर इच्छुकांनी मोर्चेबांधणीचा श्री गणेशा केला. दरम्यान गावचे सरपंचपद हाती घेत नाड्या हाती ठेवण्यासाठी उमेदवारांनी चाचपणी सुरू केली आहे. मात्र आरक्षण सोडतीवर सर्व काही अवलंबून असणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा सोडतीकडे लागली आहेत. ग्रामविकास विभागाने आदेश काढत सरपंचपदाचे आरक्षण सोडत निकाल लागल्यानंतर काढण्याचे स्पष्ट केले आहे. या आदेशामुळे ग्रामीण भागात नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. आदेशामुळे तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतीमधील आरक्षण सोडतीची प्रक्रिया बारगळणार आहे. परिणामी गावाचा कारभार एकहाती ठेवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता निवडणुकीच्या निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.