दुर्गापूर (चंद्रपूर) : दुर्गापूर कोळसा खाणीतील पाण्यात असलेल्या जलचर प्राण्यांची शिकार करण्याच्या नादात बिबट्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
दुर्गापूर खुल्या कोळसा खाणीच्या सेक्टर-२ या कोळसा खाणीत पाणी साचलेले आहे. त्याच्या अवतीभोवती जंगल परिसर आहे. याच जंगलातील एक बिबट मंगळवारी सकाळी पाण्यात असलेल्या जलचर प्राण्यांची शिकार करण्याकरिता टपून बसला होता. त्या लगतच पाण्याच्या वरून एक मोठा केबल गेला होता. बिबट्याने पाण्यात असलेल्या भक्ष्याला टिपण्याकरिता उडी घेतली.
मात्र, त्याचा अंदाज चुकल्याने मध्येच असलेल्या एका केबलला अडकून पडला. त्या खाली खोल पाणी होते. त्याचे पाय पाण्याखाली असलेल्या जमिनीवर न टेकल्याने तो पाण्यात बराच वेळ बुडून तडफडत राहिला. काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. सकाळी खाणीत कर्तव्यावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना हा बिबट मृतावस्थेत आढळून आला. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.