तळोधी बा. (चंद्रपूर) : तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गोविंदपूर क्षेत्रातील येनोली माल बिट कक्ष क्रमांक ६५ येनोली माल हद्दीत वाघ व बिबट्याच्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मृत बिबट्या मादी असल्याचे वनविभागाने सांगितले.
तळोधी बा. वनपरिक्षेत्रातील येनोली मालचे वनरक्षक पी.एम. श्रीरामे हे गस्तीवर असताना गुरुवारी सकाळी १०.३० वाजता येनोली माल बिट कक्ष क्रमांक ६५ मध्ये अंदाजे दीड ते दोन वर्षे वयाचा मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. सकाळीच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी येत मोक्का पंचनामा करून मृत बिबट्या तळोधी बा. वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सावरगाव येथील रोपवाटिकेमध्ये आणला. शवविच्छेदन करून नंतर जाळण्यात आले. या बिबट्याचा मृत्यू वाघासोबतच्या झुंजीत झाल्याचा अंदाज घटनास्थळाची पाहणी व शवविच्छेदनानंतर वनविभागाने वर्तविला आहे.
यावेळी पशुधन विकास अधिकारी ममता वानखेडे, पशुधन विकास अधिकारी एस.बी.बनाईत यांनी शवविच्छेदन केले. यावेळी मृत बिबट्याच्या काही अवयवांचे नमुने गोळा करून ते समोरील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. यावेळी सहायक वन संरक्षक के.आर. धोडने, नागभीडचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. हजारे, एस. बी. वाळके, आर. एस. गायकवाड, विवेक करंबेकर, यश कायरकर, जिवेश सयाम, प्रशांत सहारे आदी उपस्थित होते.