चंद्रपूर: सावली वनपरिक्षेत्रातील पाथरी येथील गोपालकृष्ण दादाजी ठिकरे यांच्या घरात गुरुवारी सकाळी अचानक बिबट शिरला. त्यामुळे घरात व एकूण गावातच एकच खळबळ उडाली. याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचली. पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. त्यामुळे ठिकरे कुटुंबीयांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.
गुरुवारी सकाळच्या सुमारास कोंबडी आणि बकऱ्यांवर ताव मारण्याच्या नादात एक बिबट ठिकरे यांच्या घरात शिरला. याची जाणीव त्यांना झाल्याने घरातील सर्व सदस्य भयभीत झाले. दरम्यान, बिबट असलेल्या खोलीचा दरवाजा लावून सर्व कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात आले. लगेच वनविभागाला कळविण्यात आले. वन विभागाची ट्रॅक्युलाईज करणारी चमू व अधिकारी तत्काळ घटनास्थळी आले. तब्बल पाच तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.