सिंदेवाही (चंद्रपूर) : वनपरिक्षेत्रातील मरेगाव कक्ष क्रमांक २७६ मध्ये पवनपार मार्गालगत मंगळवारी सकाळी एका बिबट्याचा जखमी अवस्थेतील मृतदेह आढळल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली. बिबट्याच्या मृतदेहावरील जखमांवरून त्याची वाघाशी झुंज झाली असावी, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
घटनेची माहिती होताच सिंदेवाहीचे सहायक उपवनरक्षक चोपडे, वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, क्षेत्र सहायक बुराडे, वनरक्षक व्ही. बी. सोरते, वनरक्षक येरमे व राठोड यांनी घटनास्थळ गाठले. सर्वांच्या समक्ष घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर बिबट्यावर अग्निसंस्कार करण्यात आले. या परिसरात वाघ आणि बिबट्याचा नेहमी संचार बघायला मिळाला आहे. अशातच सकाळी परिसरातून जाताना काहींना बिबट मृतावस्थेत आढळला.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाच्या पंचनाम्यावरून मध्यरात्रीच्या सुमारास बिबट आणि वाघाची झुंज झाली असावी. यामध्ये बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविला आहे. अधिक तपास वनविभाग करीत आहे.